भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत (फोटो सौजन्य-X)
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही अनेक नेतेमंडळींकडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला जात आहे. त्यात आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हिंगण्यात मोठे खिंडार पडले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारेंसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात तालुक्यातील 16 सरपंच, नगरपरिषदेतील सर्व 6 नगरसेवक आणि 12 कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी पक्षत्याग केला. या पक्षप्रवेशामुळे हिंगण्यात भाजपचे बळ वाढणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे व हिंगण्याचे आमदार समीर मेघे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘शरद पवार गटाचे अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारे, 16 सरपंच, 90 ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यांनी आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे’.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघात आणि नागपूर जिल्ह्यात भाजपला होईल. कारण, काही मतं विधानसभा निवडणकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग यांना मिळाली होती. त्यामुळे तेथील मोठ्या प्रमाणातील मते ही आता भाजपला मिळतील. या प्रवेशामुळे हिंगणा मतदारसंघात पक्षाची ताकद आणखी वाढेल, असेही बावनकुळे म्हणाले.
जिल्ह्यातील नेतृत्व दुबळे-बोढारे
राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर व विधानसभा निवडणूकीत पक्षाला पराभव स्विकारावा लागला. जिल्हयातील दोन्ही जागांवर पक्षाचा पराभव झाला. त्यानंतरही पक्षाने पक्ष संघटन बळकट करण्यास कुठलाही पुढाकार घेतला नाही. जिल्हयातील नेतृत्व अत्यंत दुबळे आहे. अशा नेतृत्वाने पक्षाला चांगले दिवस येतील, असे दिसत नसल्याने भाजपत प्रवेश केल्याचे उज्वला बोढारे म्हणाल्या.
डेगमा खुर्द येथून जिल्हा परिषदेवर
बोढारे या दोनवेळा हिंगणा तालुक्यातील डेगमा खुर्द येथून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या. गेल्यावेळी त्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदही त्यांना मिळाले होते. तर, हिंगणा विधानसभेची उमेदवारी त्यांना हवी होती. पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांना भविष्यातील राजकारणासाठी तुल्यबळ व्यासपीठ हवे होते. त्यानुसार संपर्कात असलेल्या अनेकांशी संपर्क साधल्यानंतर हिंगणा तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.