कर्जत/ जामखेड : कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे मार्गी लागत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत आहे. त्यातच नुकतीच जलसंधारण महामंडळाची वरिष्ठ पातळीवरील उच्चस्तरीय बैठक अहमदनगर येथे पार पडली होती. या महामंडळाच्या बैठकीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील बंधाऱ्यासंदर्भातील एकूण 26 कामे सुचवण्यात आली असून त्याचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते.
दरम्यान यामध्ये कर्जत तालुक्यातील 16 कामे तर जामखेड तालुक्यातील 10 कामांचा समावेश होता. बैठकीत झालेल्या चर्चेत दोन्ही तालुक्यातील मिळून जवळपास 20 कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते त्यास आता शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मतदारसंघात यापूर्वी बंधाऱ्याच्या दुरुस्तीची व देखभालीची विविध कामे करण्यात आली असून बंधाऱ्यातून गळणारे पाणी थांबवण्यासाठी जलसंपदा, जलसंधारण व जि.पच्या माध्यमातून अशी एकूण 150 पेक्षा अधिक कामे मंजूर असून ती कामे देखील प्रगतीपथावर आहेत.
मतदारसंघात आमदार रोहित पवारांनी वेळोवेळी प्रयत्न करून गेल्या 2 वर्षात विविध प्रकारची जलसंधारणाची प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या माध्यमातून बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे व उंची वाढवणे, नव्याने कोल्हापुरी बंधारे बांधणे , जलसंधारण महामंडळाअंतर्गत बंधारे बांधणे, तुकाई उपसा सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी इत्यादी कामे मतदारसंघात मंजूर असून यापैकी अनेक कामे मार्गी लागत असल्याचे देखील दिसून येत आहे.
मतदारसंघात पाण्याची मोठी अडचण लक्षात घेऊन आणि पूर्वी योग्य सर्वेक्षण न झाल्यामुळे पाण्यासाठी होणारी हेळसांड टाळण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेतला आणि पूर्वी पेक्षा कामाचा दर्जा देखील सुधारला आहे. आता पार पडलेल्या जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकासही शासनाची मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात असतानाच नुकताच शासनाने त्याला हिरवा कंदील दाखवत प्रशासकीय मान्यता दिली आहे. मतदारसंघात विविध शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात पोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी बोलून दाखवले आहे.
[read_also content=”‘या’ प्रकरणी संजय राऊत यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; किरीट सोमय्यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-ordered-to-appear-in-court-on-july-4-in-ya-case-information-of-kirit-somaiya-nrdm-290396.html”]
मतदारसंघात पावसाचे पडणारे पाणी जास्तीत जास्त मतदारसंघातच राहावं व त्याचा फायदा आसपासच्या शेतकऱ्यांना व्हावा यासाठी आम्ही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करत आहोत त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्याचबरोबर मृद व जलसंधारण मंत्री गडाख साहेब व जिल्हा व तालुक्याचे अधिकारी यांचे या सगळ्यांमध्ये मोठे सहकार्य लाभले आहे.
– आमदार रोहित पवार