Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चर्चेत आहेत. तर पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पोलिसांनी ३० अटींसह परवानगी दिली आहे. क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या सामन्यांसह आंतरराष्ट्रीय घडामोडींचीही उत्सुकता कायम आहे. अर्थव्यवस्थेत महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या व्याजदर धोरणाकडे लक्ष असून, शेअर बाजारावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारातील दबावाचा परिणाम दिसत आहे. महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण सध्या कमी असून, सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत पावसाची शक्यता कमी असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत.
22 Aug 2026 05:59 PM (IST)
रक्षाबंधन जवळ आलं की परदेशात राहणाऱ्या भाऊ-बहिणींची आठवण आणखी तीव्र होते. भाऊ किंवा बहीण कितीही दूर असली, तरी राखीच्या निमित्ताने प्रेमाची छोटीशी खूण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा असते. हीच भावना लक्षात घेऊन DHL Expressने यंदा पुन्हा ‘राखी एक्सप्रेस’ ऑफर आणली आहे.
22 Aug 2026 05:52 PM (IST)
धावत्या अमृतसर-मुंबई एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अवघ्या एका तासाच्या कालावधीत एसी कोचमधून तब्बल पाच मोबाईल चोरल्याचे समोर आले आहे. मुजम्मिल रहमान शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
22 Aug 2026 05:37 PM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी २३ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाने गॉल कसोटीत दणदणीत विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली. हे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे टीम इंडिया श्रीलंकेला व्हाईटवॉश देऊन मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
22 Aug 2026 05:20 PM (IST)
डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जोशी स्कूलजवळील महत्त्वाच्या पुलाचे रखडलेले काम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या पुलाचा 90 फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिणामी नागरिकांना पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर करता येत नसून परिसरातील वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे.
22 Aug 2026 05:10 PM (IST)
सोशल मीडिया विश्वातील अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक (TikTok) आणि त्याची मूळ कंपनी बायटडान्स (ByteDance) सध्या एका मोठ्या कायदेशीर संकटात सापडली आहे. मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेचे आणि गोपनीयतेच्या कायद्यांचे गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर कंपनीला अमेरिकेत तब्बल ४०० दशलक्ष डॉलर्सचा, म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे ३,३०० कोटी रुपयांचा दणका बसला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने आणि फेडरल ट्रेड कमिशनने केलेल्या या कठोर कारवाईमुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये खळबळ उडाली असून डिजिटल विश्वात मुलांच्या डेटा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
22 Aug 2026 04:57 PM (IST)
आजकाल पैसे पाठवण्यासाठी UPI, नेट बँकिंग आणि इतर ऑनलाइन पर्यायांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अगदी साधं बिस्कीट आणायला गेलो तरी हल्ली ऑनलाईन पेमेंट करतात. तरी सुद्धा मोठव्यवहार मोठे व्यवहार जे चेकच्याद्वारे केले जातात. उदा. घर, जमीन, व्यवसाय किंवा मोठ्या रक्कम चेकने केली की जो सोयीचे तसेच आपल्याकडे एक पुरावा राहतो. पण आता चेकबुकशी काही संबंधित काही बदल होणार आहे. ते आपल्याला माहिती पाहिजे. सायूबर क्राईम कमी करण्यासाठी चेकमध्ये सुरक्षा वाढवण्यावर भर दिला जात आहे. बनावट चेक तयार करणे, चेकची नक्कल करणे किंवा त्यातील माहिती बदलणे असे प्रकार रोखण्यासाठी नवीन सुरक्षा पद्धती वापरली जाणारा आहे. वाचा सविस्तर...
22 Aug 2026 04:44 PM (IST)
इंग्लंड महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज केट क्रॉसने प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. केटने २१ ऑगस्टच्या संध्याकाळी निवृत्तीची घोषणा केली. केट क्रॉस गेल्या १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत होती. ही ३४ वर्षीय खेळाडू २०२६ च्या हंगामाच्या अखेरीस क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होईल. इंग्लंडचे तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व करताना, तिने १०२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १४० विकेट्स घेतले आहेत. क्रॉसने २०१३ मध्ये इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
22 Aug 2026 04:27 PM (IST)
पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये ABVP आणि NSUI यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ABVP कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, वसतिगृहातील काही विद्यार्थिनींवर दबाव टाकण्यात आला. एका विद्यार्थिनीला कथितरीत्या कॅमेऱ्यासमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावात असल्याचा दावा लोंढे यांनी केला.
22 Aug 2026 04:17 PM (IST)
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे, यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. आता शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद होणे बाकी आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर निशाणा साधला. पक्षाच्या मालकीबाबत वारसाहक्काचा मुद्दा लागू होत नसल्याचे त्यांनी म्हटले. “वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही. वारसाहक्काने वडिलांची मालमत्ता मिळू शकते, मात्र पक्ष मिळत नसतो,” अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर अनेक बाबी अधिक स्पष्ट होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
22 Aug 2026 04:14 PM (IST)
राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करत काही खळबळजनक दावे केले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना नियोजित पद्धतीने आणले जात असल्याचा आरोप केला. फडणवीस यांच्या दाव्यानुसार, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सुमारे 90 ते 95 टक्के मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजशी संबंधित आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
22 Aug 2026 04:00 PM (IST)
असित मंडल/पुणे: भारतात २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि ऐतिहासिक पदकांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि हॉकी इंडियाने तळागाळापासून व्यापक तयारी सुरू केली आहे. ग्रासरूट स्तरापासून वरिष्ठ राष्ट्रीय संघापर्यंत प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी भक्कम आणि वैज्ञानिक व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे.
22 Aug 2026 03:55 PM (IST)
अकोला : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या अकोला परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अकोला परिमंडळातील ५३ हजार ८५४ वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता २०० मेगावॅटचा टप्पा पार झाला आहे. दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे, तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळवून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
22 Aug 2026 03:50 PM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना मॅके येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधार कमिन्सचा निर्णय योग्य ठरवला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने एकट्याने बांग्लादेशच्या सहा फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
22 Aug 2026 03:40 PM (IST)
अमेरिकेच्या (America) राजकीय पटलावर एका सामान्य नागरिकाने आपल्या ध्येयनिष्ठेच्या आणि कष्टाच्या जोरावर इतिहास घडवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या पुरोगामी नेत्या आयशा वहाब यांनी कॅलिफोर्नियाच्या १४ व्या काँग्रेस मतदारसंघातील विशेष निवडणुकीत दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह त्या अमेरिकी काँग्रेसमध्ये (संसदेत) प्रवेश करणाऱ्या पहिल्या अफगाण-अमेरिकन नागरिक आणि पहिल्या अफगाण-अमेरिकन महिला खासदार ठरल्या आहेत
22 Aug 2026 03:25 PM (IST)
सर्वच महिलांना आपले केस कायमच सुंदर आणि चमकदार हवे असतात. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले हेअर मास्क, हेअर कलर तर काहीवेळा हेअर डाय सुद्धा लावले जातात. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली मेहेंदी, हेअर कलर किंवा डाय लावला जातो.
22 Aug 2026 03:17 PM (IST)
पनवेल: पनवेल महानगरपालिकेतर्फे २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत प्रसिद्ध ‘सुपरकॉप’ आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश सहभागी होणार असून मराठी अभिनेते अंकुश चौधरी हे मॅरेथॉनचे बँड ॲम्बेसिडर आहेत. देश-विदेशातील ७हजारांहून अधिक धावपटूंनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे.
22 Aug 2026 03:00 PM (IST)
रिपोर्ट्सनुसार, विवो टी 5 प्रो 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 6 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 41,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत 7 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत आता 46,999 रुपये झाली आहे. तर टॉप व्हेरिअंटच्या किंमतीत कंपनीने आणखी वाढ केली आहे.
22 Aug 2026 02:50 PM (IST)
पुणे येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. आंदोलनात विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारले असता, विखे पाटील यांनी राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
22 Aug 2026 02:40 PM (IST)
Anc कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात एका शाळेसमोर असलेल्या नाल्यावर काँक्रीटचे बांधकाम करण्यात आले असून, नारावरील काँक्रीट तुटल्यामुळे त्यावर लोखंडी पत्रा टाकण्यात आला आहे. मात्र हा पत्रा असुरक्षित असल्याने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
22 Aug 2026 02:30 PM (IST)
सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G चे 12GB + 256GB व्हेरिअंट कंपनीने 80,999 रुपयांच्या किंमती लाँच केले होते. मात्र आता कंपनीने या व्हेरिअंटची किंमत 4,000 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 84,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, स्मार्टफोनचे 12GB + 512GB हे टॉप एंड व्हेरिअंट 92,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते.
22 Aug 2026 02:20 PM (IST)
NEET परीक्षेतील कथित पेपर लीक आणि अनियमितता, जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी साहिल लोचबला पेलेट गनचे छर्रे लागल्याचा आरोप आणि ‘वंदे मातरम्’शी संबंधित राजकीय वादावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे भाजपने राहुल गांधींच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे.
22 Aug 2026 02:10 PM (IST)
स्वीडिश कार उत्पादक कंपनी व्होल्वो इंडिया १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या flagship इलेक्ट्रिक पोर्टफोलिओचा विस्तार करत EX90 आणि ES90 या दोन नव्या अलिशान इलेक्ट्रिक गाड्या भारतात लाँच करणार आहे. SPA2 आर्किटेक्चर आणि 800V इलेक्ट्रिकल तंत्रज्ञानावर आधारित या गाड्या व्होल्वोच्या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक कार्स असतील.
22 Aug 2026 02:00 PM (IST)
भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची डायमंड लीग २०२६ मध्ये चमकदार कामगिरी दिसून आली. नीरजने या हंगामातील सर्वोत्तम थ्रो केला. पण तरीही तो दुसऱ्या स्थानावर राहिला.राष्ट्रकुल क्रीडा २०२६च्या स्पर्धेनंतर ही नीरजची पहिली स्पर्धा होती. नीरजने पहिल्या फेरीत ८३.५४ मीटर थ्रो करुन स्पर्धेची प्रभावी सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत ८८.०५ मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले.तो केवळ ९ सेंटिमीटरने विजेतेपदापासून दूर राहिला. श्रीलंकेच्या रुमेश थरंगाने ८८.१४ मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले. कोणत्याही स्पर्धेतील हा त्याचा सलग पाचवा विजय आहे.
22 Aug 2026 01:55 PM (IST)
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या आयुष्यात एका गोड पाहुण्याचे आगमन झाले आहे. तेजस्विनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, चाहत्यांनी तिच्या या आनंदाच्या बातमीवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तेजस्विनी आणि तिचे पती शिवसेना नेते समाधान सरवणकर यांच्या कुटुंबात एका चिमुकल्या पावलांचे आगमन झाले. बाळाच्या किलबिलाट आवाज असल्याने लोणीकर आणि सरवणकर या दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
22 Aug 2026 01:45 PM (IST)
सध्या एफआयएच हॉकी वर्ल्डकप स्पर्धा २०२६ सुरू आहे. मात्र या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या फेरीत म्हणजे पूल डी मध्ये भारतीय हॉकी संघाचा पराभव झाला आहे. बाळद्या नेदरलँड्सच्या संघाने भारतीय संघाचा २-० असा पराभव केला आहे. सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला या पराभवामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत मोठा धक्का बसला आहे.
22 Aug 2026 01:35 PM (IST)
पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने बहरणाऱ्या माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा पर्यटनासाठी दाखल होत आहेत. मात्र पर्यटकांचे आकर्षण ठरणारा धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात माथेरान परिसर हिरवाईने नटतो. दाट धुके, पावसाच्या सरी आणि डोंगर-दऱ्यांमधून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह विविध भागांतून पर्यटक माथेरानला येतात.
22 Aug 2026 01:25 PM (IST)
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण त्याचा चित्रपट किंवा फिटनेस नाही, तर त्याच्या फिटनेस ब्रँडशी संबंधित एका जिममध्ये घडलेली धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास-1 या परिसरात असलेल्या जिममध्ये गुरुवारी रात्री अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ही आग रात्री सव्वा दहाच्या आसपास जिमच्या पहिल्या मजल्याला आग लागली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आहे.
22 Aug 2026 01:15 PM (IST)
शहरातील उंच इमारतींमध्ये लागणाऱ्या आगीवर अधिक प्रभावी आणि जलदगतीने नियंत्रण मिळविण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका अग्निशमन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उंच इमारतींवरील आगी विझविण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून अग्निशमन करण्याचे प्रात्यक्षिक अग्निशमन विभागाच्या वतीने सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून उंच इमारतींच्या अशा ठिकाणी, जिथे पारंपरिक अग्निशमन यंत्रणेद्वारे पोहोचणे आव्हानात्मक ठरते, तेथे ड्रोनच्या सहाय्याने थेट आगीच्या ठिकाणी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याची कार्यपद्धती दाखविण्यात आली.
22 Aug 2026 01:09 PM (IST)
मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (MMRTA) बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला (Rickshaw-Taxi Fare Hike) मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये, तर रिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये होणार आहे. सरकारकडून यासंदर्भातील अधिसूचना जारी झाल्यानंतर 1 सप्टेंबर 2026 पासून नवीन भाडेदर लागू होण्याची शक्यता आहे.
22 Aug 2026 12:59 PM (IST)
अमरावतीच्या परतवाड्यातील सिव्हील लाईन परिसरात निवृत्त न्यायाधीशांच्या बंद घराची रेकी करून तब्बल 11 लाख 90 हजार रुपयांची चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. चोरीच्या आठ दिवस आधी आरोपींनी कट रचला होता. 80 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 210 सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करत स्थानिक गुन्हे शाखा आणि परतवाडा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या टोळीचा छडा लावला. आरोपींकडून 67.02 ग्रॅम सोन्याचे दागिने, 76 हजार 700 रुपये रोख, तीन वाहने आणि पाच मोबाइल, असा 11 लाख 22 हजार 686 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
22 Aug 2026 12:47 PM (IST)
भारताच्या परकीय चलनसाठ्यात 9.905 अब्ज डॉलरची वाढ झाली असून, 14 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय गंगाजळी 716.907 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.
22 Aug 2026 12:38 PM (IST)
राज्यात महायुती भक्कम असली, तरी रायगड जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील राजकीय वाद मिटण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला असून, महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीसह सुनील तटकरेंवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही," असा प्रहार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर केला आहे.
22 Aug 2026 12:28 PM (IST)
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पेलेट गन हल्ल्यातील पीडित साहिल लोहबाखची एफआयआर दाखल होईपर्यंत तळ ठोकून राहिले. याच मुद्द्यावरून भाजप नेते जेपी नड्डा यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींचे आंदोलन विद्यार्थ्यांसाठीही नाही आणि न्यायासाठीही नाही. हे काँग्रेस पक्षाची राजकीय निराशा आणि राहुल गांधी प्रसिद्धीची भुकलेले असल्याचे दाखवते, असा टोला जेपी नड्डा यांनी लगावला.
22 Aug 2026 12:19 PM (IST)
पोलिस दलात 10 वर्षांची अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. पोलिस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहतील. त्यांच्या भोजनाचा आणि इतर सांभाळाचा सर्व आर्थिक भार गृहविभाग उचलणार आहे.
22 Aug 2026 12:07 PM (IST)
मुंबई शहरात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार टॅक्सीचे किमान प्रवासभाडे 31 रुपयांवरून 33 रुपये, तर रिक्षाचे भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये होणार आहे. सरकारकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर 1 सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.
22 Aug 2026 11:59 AM (IST)
खेड तालुक्यातील नातूनगर रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळून तब्बल दीड महिना उलटला, तरीही हा रस्ता अद्याप पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नातूनगरमधून जाणारा हा महत्त्वाचा मार्ग शिवतर, जामगे, आंबये तसेच चिंचाळी मार्गे पुढे जोडला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. दरड कोसळल्यानंतर रस्ता बंद असून, स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडेही विनंती करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग सुरू झाल्यास नागरिकांचे जवळपास २० ते २५ किलोमीटर अंतर वाचणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
22 Aug 2026 11:48 AM (IST)
नव्या इमारतीच्या पायासाठी खोदकाम सुरू असताना विकासकाकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे शेजारील रहिवासी इमारत खचल्याची घटना वसई पूर्वेतील गोखिवरे, लागीपाडा परिसरात घडली. या घटनेनंतर शालोम अपार्टमेंटमधील २३ कुटुंबीयांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अतिधोकादायक झालेली इमारत महापालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आली.
वसई-विरार शहरात इमारत दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, महिनाभरातील ही चौथी घटना असल्याचे समोर आले आहे. शहरात झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणासोबतच रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गेल्या काही काळात १० ते २० वर्षे जुन्या इमारतींचे स्लॅब कोसळणे, सज्जा पडणे किंवा इमारतीला तडे जाणे अशा घटना घडत असताना, आता शेजारील नवीन बांधकामांच्या कामांमुळेही रहिवासी इमारतींना धोका निर्माण होत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
22 Aug 2026 11:36 AM (IST)
कॅनोसा स्कूल CBSE, माणिकपूर येथे ‘व्हिंटेज – सुवर्णयुगाची पुनर्भेट’ या संकल्पनेवर आधारित सामाजिक शास्त्र प्रदर्शन उत्साहात पार पडले. इयत्ता तिसरी ते नववीतील २९७ विद्यार्थ्यांनी ५३ गटांमध्ये सहभागी होत विविध ऐतिहासिक कालखंड, संस्कृती, वास्तू, शोध आणि जीवनशैलीच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या.
लाल किल्ला, पिरॅमिड्स, ताजमहाल, टायटॅनिक, पाषाणयुग, फोनचा उत्क्रांती प्रवास, व्हिंटेज फॅशन, चलन, फर्स्ट डे कव्हर्स आणि प्राचीन खेळ यांसह विविध विषयांचे सादरीकरण करण्यात आले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील जुन्या आणि ऐतिहासिक वस्तूही प्रदर्शनात मांडत कौटुंबिक इतिहासाला उजाळा दिला. तर इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी व्हिंटेज पोशाख परिधान करून प्रदर्शनाची रंगत वाढवली.
22 Aug 2026 11:26 AM (IST)
वसई-विरारमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या अगदी जवळ विवेक तिवारी रास्ता सत्याग्रहाला बसले आहेत. गेल्या सात दिवसांत अनेक उपायुक्तांनी तिवारी यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांवर ठोस कारवाईची मागणी करत तिवारी आंदोलनावर ठाम आहेत.
22 Aug 2026 11:13 AM (IST)
विरार पूर्वेतील चंदनसार रोडवरील भालचंद्र नगर परिसरात मध्यरात्री सशस्त्र चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१९ ऑगस्टच्या मध्यरात्री पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास ३ ते ४ चोरटे लोखंडी शस्त्रे घेऊन भालचंद्र नगरमधील C, D आणि E विंग परिसरात फिरताना दिसून आले. चोरट्यांनी काही घरांना बाहेरून कड्या लावून रहिवाशांना घरातच कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ४ ते ५ घरांचे दरवाजे फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
मात्र, घरांना असलेल्या सेफ्टी डोअरमुळे चोरट्यांचा डाव फसला. या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून, त्यामध्ये हातात लोखंडी शस्त्रे घेऊन चोरटे परिसरात फिरताना स्पष्टपणे दिसत आहेत.
घटनेनंतर भालचंद्र नगरमधील रहिवाशांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
22 Aug 2026 11:00 AM (IST)
मुंबई : न्यायालयाचा अंतरिम आदेश अस्तित्वात असताना स्थानिक आमदाराच्या सूचनेनुसार कारवाई का करण्यात आली, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि नगररचना सहाय्यक संचालक पुरुषोत्तम एम. शिंदे यांना केला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी आमदाराच्या सूचनेला प्राधान्य दिल्याबद्दल खंडपीठाने महापालिका प्रशासनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे का?” असा सवाल करत न्यायालयाने, “तुम्ही आमदाराचे ऐकता, पण खंडपीठाचे ऐकत नाही. तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही,” अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले.
22 Aug 2026 10:31 AM (IST)
टेक कंपनी पोकोने भारतात 7900mAh बॅटरीसह एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Poco M8x 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस M8 सीरीजचा तिसरा स्मार्टफोन आहे, जो कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने या सिरीजमध्ये Poco M8 5G आणि Poco M8 Power स्मार्टफोन लाँच केले आहेत.
22 Aug 2026 10:21 AM (IST)
आयुष्यात अनेकदा आपल्याला असे वाटते की, एक वाईट निकाल आपले संपूर्ण भविष्य ठरवतो, पण वास्तवात तो केवळ एक टप्पा असतो, संपूर्ण यश नाही. ही अशीच कथा आहे जैनेंद्रजीत यांची, ज्यांनी दहावीच्या वर्गात मिळालेल्या कमी गुणांना आपली कमजोरी बनवण्याऐवजी नव्या बदलाची सुरुवात केली. त्यावेळी कदापि त्यांना अंदाज नसेल की, हाच निकाल भविष्यात त्यांची सर्वात मोठी ताकद बनेल. एका सामान्य मुलाने कशा प्रकारे अपयशाला हिमतीत बदलले आणि देशातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला, हे जाणून घेऊया.
22 Aug 2026 10:11 AM (IST)
टेक कंपनी iQOO ने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन iQOO Z11S या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये तब्बल 10,000mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन भारतात किंवा दुसऱ्या देशात लाँच केला जाणार की नाही, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहिर केली नाही. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
22 Aug 2026 09:35 AM (IST)
Delh Rain alrt : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. शनिवारी सकाळी दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, रस्त्यांवर पाणी जमा होत आहे.
हवामान विभागाने सकाळ ते दुपार दरम्यान काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. मोती बाग, फिरोज शाह रोड, एपीजे अब्दुल कलाम रोड आणि मंदिर मार्ग यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत कमाल तापमान ३२°C ते ३४°C आणि किमान तापमान २४°C ते २६°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
22 Aug 2026 09:30 AM (IST)
NSUI ABVP Clash : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उद्या होणाऱ्या 'छात्रों की गुंज' (Chhatron Ki Goonj Pune) या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. भाजपची विद्यार्थी संघटना 'अभाविप' आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना 'एनएसयूआय' यांच्यात जोरदार खटपट आणि हाणामारी झाली आहे.
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप एनएसयूआयच्या वतीने करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेस विद्यार्थी संघटना शुल्काबाबत चुकीची विधाने करून घाणेरडे राजकारण करत असल्याचा दावा अभाविपने केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या कार्यक्रमात राहुल गांधी तरुणांशी संवाद साधणार असून, त्याआधीच झालेल्या या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
22 Aug 2026 09:30 AM (IST)
India vs Sri Lanka 2nd Test Preview: गॉल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा १६५ धावांनी धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर, आता दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घालण्याचा भारतीय संघाचा मानस आहे.
कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत सर्वच विभागांत दमदार कामगिरी केली. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली, तर गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची अक्षरशः कोंडी केली. विशेषतः मानव सुथारने दोन्ही डावांत मिळून तब्बल १० बळी (विकेट्स) घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम संघ निवडताना संघ व्यवस्थापनासमोर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे आव्हान असेल.
22 Aug 2026 09:25 AM (IST)
Rahul Narwekar On Gen Z: महाराष्ट्रातील 'जेन-झी' (Gen-Z) पिढी ही महाराष्ट्रासोबतच आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका या कधीही कुठल्या 'ऑपरेशन'साठी होत नाहीत, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'जेन-झी' पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
"कोणत्याही पक्षाने अंतर्गत लोकशाहीचा वापर करून आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या, तर पक्ष फुटणारच नाहीत," अशी टिप्पणी नार्वेकर यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सुनावणी सुरू असतानाच त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, धनुष्यबाणाबाबतचा खटला न्यायप्रविष्ट असल्याने आणि आपण विधानसभा अध्यक्ष व कायद्याचे विद्यार्थी असल्याने यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
22 Aug 2026 09:20 AM (IST)
Mumbai FDA Action: अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत मोठी कारवाई करत कुलाबा येथील मॅकडोनाल्ड्स कियोस्कसह तब्बल १३ उपाहारगृहांचे परवाने रद्द केले आहेत. एफडीएच्या पथकाने केलेल्या अचानक पाहणीत या ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले आहे.
१९ ऑगस्ट रोजी टाकलेल्या धाडीत बॉम्बे प्रेसिडन्सी रेडिओ क्लब लिमिटेडमध्ये ४७ टक्के नियमांचे उल्लंघन आढळले. तपासणीदरम्यान तेथे माशांचा वावर, मेलेले झुरळ आणि भांडी धुण्याच्या जागी कॉक्रोच ट्रॅप आढळून आले. याशिवाय रेडिओ क्लब आणि स्टेटस उपाहारगृहावरही ही कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर 'एफडीए'ने कठोर पाऊल उचलल्याने उपाहारगृह चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
22 Aug 2026 09:15 AM (IST)
Vishakha Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा मुंबई महापालिकेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. हे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव अजून मुंबई महापालिका सभागृहात मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पालिका सभागृहात हा विषय मांडल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा होऊन पुढील अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






