समृद्धी महामार्गावर ७ महिन्यांत ८४ अपघात (फोटो सौजन्य-X)
वर्धा : वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. असे असले तरी सात महिन्यात ८४ अपघात झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. या अपघातांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहे. महामार्ग पोलिसांनी केलेल्या उपाययोजना, वाहन मालकांचे समुपदेशन आणि इतर गोष्टींमुळे समृद्धीवरील अपघातांमध्ये घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत समृद्धी महामार्गावर एकूण ८४ अपघात झाले. यामध्ये मृतांची संख्या ९ आहे. तर १९ जण गंभीर आणि किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत घट झाल्याचा दावा महामार्ग पोलिसांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यांमधून जातो.
महामार्गावर विविध ठिकाणी टोल प्लाझा आणि इंटरचेंजची व्यवस्था करण्यात आली आहे. जिथून चढताना आणि उतरताना प्रत्येक वाहनाची नोंद होते. महामार्गावरून जाताना वाहनांच्या फिटनेसची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अपघात झाल्यास, समृद्धी महामार्गाचे महामार्ग पोलिस आणि बचाव पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचतात.न
अनेक गोष्टींवर दिला जातोय भर
समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या जाम मदत केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक टोल नाक्यावरील प्रवेशद्वारावर समुपदेशन केले जाते. प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी केली जाते. चालकाने सीट बेल्ट लावला आहे की नाही, चालक मद्यधुंद आहे काय, वाहनांच्या टायर्सची गुणवत्ता, वाहनांची फिटनेस इत्यादीची तपासणी केली जात आहे. या घटनामुळे वाहतूक पोलिसांसमोर नवे आव्हान ठरले आहे.
नाशिकमधील व्यावसायिकाचा झाला होता मृत्यू
समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात नाशिकमधील व्यावसायिक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने सुनील हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी त्यावेळी केला होता.