संग्रहित फोटो
पुणे : सायबर चोरट्यांनी शेअर मार्कट, टास्क फ्रॉड आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवत कारवाईची भीती दाखवून शहरातील ७ जणांना तब्बल ८४ लाख ३२ हजारांना गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महिलेला शेअर खरेदीवर चांगला नफा
विमाननगर भागातील महिलेला शेअर खरेदीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने ४१ लाख ९२ हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांत अमेलिया, चंद्रप्रकाश पेडियार नाव्याच्या व्यक्तीसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेशी सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यांना शेअर मार्केटच्या संदर्भात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देऊ, असे सांगितले. पुढे त्यांना एका ग्रुपमध्ये ऍड केले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून गुंतवणूकीच्या नावाखाली पैसे उकळे.
सायबर ठगांनी गंडा घातला
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दिली. दुसऱ्या घटनेतही बिबवेवाडी व्यक्तीला अशाच प्रकारे सायबर ठगांनी गंडा घातला आहे. शेअर मार्केट ट्रेडींगमधील गुंतवणूकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ३ लाख ५८ हजार रुपये उकळले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी हमीर गडवी, संजय कुमार यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
३९ वर्षीय तरुणीची भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार
कात्रज कोंढवा रस्ता परिसरातील तरुणीला पोलीस असल्याचे सांगत कारवाईच्या भितीने पाच लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. गौरव शुक्ला, रमेश देव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीशी संपर्क साधून आरोपींनी ते दिल्ली पोलिसदलातील सायबर पोलीस बोलत असल्याचे सांगितले. विश्वास बसावा यासाठी बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर तुमच्याविरुद्ध आमच्याकडे केस असून, अटक होईल असे धमकावले. मात्र, त्यात मदत करून केस क्लिअर करण्याबरोबरच एनओसी देण्यासाठी मनीलॉन्ड्रींग झाली असल्याचे सांगितले.
११ लाख ४४ हजारांचा गंडा
पार्ट टाईम नोकरीचे प्रलोभन दाखवून टास्क फ्रॉडद्वारे कोंढव्यातील ४२ वर्षीय व्यक्तीला सायबर ठगांनी ११ लाख ४४ हजारांचा गंडा घातला. टेलीग्राम अॅपच्या माध्यमातून संपर्क साधून फसवणूक केली आहे. तर साईबाबानगर कोंढवा येथील २९ वर्षीय तरुणाला देखील अशाच पद्धतीने ४ लाख २६ हजारांची फसवणूक केली. हडपसर येथील तरुणीला टास्क रिव्हूव देण्याच्या बहाण्याने ९ लाख ५३ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा नोंदवला. मगरपट्टा हडपसर येथील ३४ वर्षीय तरुणीची देखील सायबर ठगांनी प्रिपेड टास्क देऊन ८ लाख ६१ हजारांची फसवणूक केली. याबाबत देखील हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.