आजपासून सुरू होणार अखिल भारतीय साहित्य संमेलन (फोटो- सोशल मीडिया)
उद्यापासून सुरू होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
ग्रंथदिंडीने होणार सुरुवात
३३ वर्षांनंतरसाताऱ्यात हा साहित्यिक आनंदमेळा रंगणार
सातारा/पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून ऐतिहासिक सातारा नगरी साहित्यिक व साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर साताऱ्यात हा साहित्यिक आनंदमेळा रंगणार असून, शतकपूर्व ठरणाऱ्या या संमेलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) व मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शहरातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. १) भव्य व दिमाखदार ग्रंथदिंडीने संमेलनाचा शुभारंभ होणार आहे.
संमेलनानिमित्त सातारा शहराचे व्यापक सुशोभीकरण करण्यात आले आहे. महामार्गांपासून शहरात प्रवेश करतानाच भव्य स्वागतफलक, बोधचिन्हे, फलक व आकाशफुगे लक्ष वेधून घेत आहेत. जिल्हा प्रशासन व नगरपालिकेच्या सहकार्याने संपूर्ण शहराला उत्सवी स्वरूप देण्यात आले आहे.१४ एकर क्षेत्रफळावर असलेल्या छत्रपती शाहू स्टेडियममध्ये मुख्य मंडप, भव्य ग्रंथप्रदर्शन, कवी कट्टा, गझल कट्टा व विविध साहित्यिक उपक्रमांसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत. मुख्य मंडपाची आसन क्षमता सुमारे १० हजार असून ग्रंथप्रदर्शनासाठी जर्मन हँगरमधील २५४ गाळे उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुख्य मंडपात प्रवेशासाठी ग्रंथप्रदर्शनातूनच मार्ग असल्याने साहित्यरसिकांची मोठी गर्दी येथे अपेक्षित आहे.
साताऱ्यात होणार ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! आकर्षक चित्ररथ अन्…; काय काय असणार?
चांदीच्या ताटात भोजन
१९९३ साली याच ठिकाणी ६६वे साहित्य संमेलन भरले होते, हा योगायोग सातारकरांसाठी विशेष ठरणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यिकांचे स्वागत पारंपरिक सातारी पद्धतीने करण्यात येणार असून साताऱ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष निमंत्रित साहित्यिकांना चांदीच्या ताटात भोजन देऊन मराठ्यांच्या राजधानीतील प्रेमळ आदरातिथ्य अनुभवता येणार आहे. साहित्यप्रेमींच्या सोयीसाठी आरोग्य, स्वच्छता, वीजपुरवठा व अग्निशमन यंत्रणेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दोन रुग्णवाहिका, शंभरहून अधिक स्वच्छतागृहे, सततची साफसफाई, तीन अग्निशमन बंब तसेच स्वतंत्र वाहनतळाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासन व परिवहन विभागाचे सहकार्य घेण्यात आले आहे.
साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेसे संमेलन
स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, “मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात साहित्यिक व साहित्यप्रेमींचे स्वागत करण्याचा मान मिळणे अभिमानास्पद आहे. साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेसे संमेलन घडेल,” असा विश्वास व्यक्त केला.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी, “कार्यक्रमांच्या वैविध्यामुळे हे शतकपूर्व संमेलन गुणवत्तेची नवी उंची गाठेल,” असे नमूद केले.कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनीही संमेलन अधिक वैशिष्ट्यपूर्ण व लक्षवेधी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.शतकपूर्व ठरणाऱ्या या साहित्य संमेलनामुळे सातारा पुन्हा एकदा मराठी साहित्याच्या नकाशावर केंद्रस्थानी येणार आहे.






