९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (फोटो- सोशल मीडिया)
साताऱ्यात होणार ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने घेतला वेग
विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी काढण्यात येणार
पुणे: येत्या १ ते ४ जानेवारीदरम्यान साताऱ्यात रंगणार्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने वेग घेतला आहे. परंपरेला उजाळा देण्यासोबतच या वर्षी संमेलनात नावीन्यपूर्ण उपक्रमांची भर असेल. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान, संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि महामंडळाच्या माजी अध्यक्षांचा निमंत्रित म्हणून समावेश ही वैशिष्ट्ये यंदाच्या संमेलनाची शोभा वाढवणार आहेत. पुस्तक दालनातून थेट संमेलनस्थळाकडे जाणारी विशेष व्यवस्था, साहित्यिक उपक्रमांसोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचीही जोड देण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलनाची देदीप्यमान परंपरा जपत असतानाच साताऱ्यातील या संमेलनातून भविष्यातील संमेलने वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण करण्याच्या नव्या वाटा आम्ही निर्माण करत आहोत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे महामंडळाचे कार्यालय तीन वर्षे राहणार असल्याने आगामी संमेलनांना नव्या दिशा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर साहित्य संमेलन भरत असल्याने साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. नावनोंदणीला मागील वर्षांच्या तुलनेत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कविकट्टा आणि गझलकट्टा यांना तरुण साहित्यिक आणि कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संमेलनात समकालीन पुस्तकांचे परीक्षण, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांची उपस्थिती, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी विद्यार्थ्यांचा संवाद, तसेच चाकोरीबाहेरील विषयांवरील परिसंवाद असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. देशाच्या राजधानीनंतर आता मराठ्यांच्या राजधानीत संमेलन भरत असल्याने विशेष उत्सुकता आहे. विविध समित्यांमार्फत तयारी अंतिम टप्प्यात असून सातारकर साहित्यप्रेमी आणि रसिकांच्या स्वागतासाठी आतुर आहेत, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.
साताऱ्यातील संमेलनाला एक कोटींचा अतिरिक्त निधी
राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला १ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जाहीर केला आहे. साताऱ्यात होत असलेले यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आदर्शवत संमेलन ठरेल, अशी अपेक्षा सामंत यांनी बोलताना व्यक्त केली.






