पुणे-मुंबई वाहतूक कोंडी संपवण्यासाठी १३५ किमीचा शिरूर-उरण मल्टिनोडल कॉरिडॉर होणार
Pune-Mumbai Traffic Jam: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवासी, नोकरदार तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर या मागणीला यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली. खेड–आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत–उरण मल्टिनोडल कॉरिडॉर उभारणीला राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही महिन्यांत मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर अनेक वेळा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत तब्बल ३० तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघात, वाहन बिघाड तसेच दुरुस्तीच्या कामांमुळे हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले. या घटनेमुळे एकाच मार्गावर अवलंबून असलेली पुणे–मुंबई वाहतूक व्यवस्था किती असुरक्षित आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी ठाम भूमिका घेत, या समस्येवर पर्याय म्हणून शिरूर– चाकण– तळेगाव– कर्जत– उरण मल्टिनोडल कॉरिडॉर उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. सुमारे १३५ किलोमीटर लांबीचा चारपदरी कॉरिडॉर उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच नगर रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेष म्हणजे शिरूर आणि चाकण एमआयडीसी परिसरातील औद्योगिक मालवाहतूक उरण येथील जेएनपीटी बंदराशी थेट जोडली जाणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीवरील ताण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीची समस्या कमी होईल.
दरम्यान, या महत्त्वाच्या विषयावर सभागृहात सातत्याने आवाज उठवून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आमदार बाबाजी काळे यशस्वी ठरल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. आता या प्रकल्पाची प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-सुमारे १३५ किमी लांबीचा चारपदरी कॉरिडॉर
– शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत–
-उरण असा मार्ग
-चाकण व शिरूर एमआयडीसीला थेट जेएनपीटी बंदराशी जोडणी
-पुणे व पिंपरी-चिंचवड वाहतुकीवरील ताण ७०–८०% कमी होण्याची शक्यता
-औद्योगिक मालवाहतूक अधिक वेगवान व सुलभ
“मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीला पर्याय मिळावा, यासाठी मी सभागृहात वारंवार हा मुद्दा मांडत आलो आहे. हा रस्ता केवळ खेड तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास या रस्त्याचा मोठा फायदा होईल. लवकरच या प्रकल्पाबाबत योग्य निर्णय होईल. तसेच या मार्गामुळे खेड तालुक्यातील पर्यटनालाही चालना मिळेल आणि हा रस्ता खेड तालुक्यासाठी भाग्यरेषा ठरेल.”
— बाबाजी काळे (आमदार, खेड–आळंदी मतदारसंघ)






