ज्येष्ठांसाठी 'लालपरी' ठरतीये फायद्याची; तब्बल पावणेदोन लाख जणांनी केला मोफत प्रवास
भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू केलेली विशेष सवलत योजना सध्या वृद्धापकाळातील प्रवासासाठी एक भक्कम आधार बनली आहे. जानेवारी महिन्याची ताजी आकडेवारी पाहता सकारात्मक कल समोर आला आहे. सर्वसाधारणपणे ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिक प्रवासाचा अधिक लाभ घेतील अशी धारणा होती. मात्र, वास्तवात ७५ वर्षांवरील ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेला दिलेला प्रतिसाद थक्क करणारा आहे.
भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, गोंदिया आणि तिरोडा या सहा आगारांची १ ते ३१ जानेवारीपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास, ७५ वर्षांवरील प्रवाशांची संख्या ६५-७५ वयोगटातील प्रवाशांच्या तुलनेत जवळपास दुपटीने अधिक आहे. जानेवारी महिन्यात ६५ ते ७५ वयोगटातील १ लाख २ हजार ७८८ ज्येष्ठांनी ५० टक्के सवलतीत प्रवास केला, तर ७५ वर्षांवरील १ लाख ९७हजार ६१४ प्रवाशांनी पूर्णपणे मोफत प्रवासाचा लाभ घेतला.
महामंडळाच्या धोरणानुसार, ७५ वर्षांवरील नागरिकांना साध्या आणि निमआराम बसेसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवासाची सोय आहे. तर ६५ ते ७५ वयोगटातील प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाते. ही पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधाच ७५ पार प्रवाशांची संख्या वाढण्यामागील मुख्य कारण ठरली आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व नोंदणी
७५ वर्षांवरील नागरिकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत स्मार्ट कार्डवर आधारित मोफत प्रवास पास जारी केला जातो. यामुळे प्रवासादरम्यान वारंवार रोख रक्कम बाळगण्याची किंवा तिकीट घेण्याची कटकट संपली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र यांसारखा वयाचा अधिकृत पुरावा असणे आवश्यक आहे. ही नोंदणी प्रक्रिया कोणत्याही जवळच्या एसटी आगारात पूर्ण करता येते. विशेष म्हणजे, महिला ज्येष्ठ नागरिकांनाही वयाची अट पूर्ण केल्यास पुरुषांप्रमाणेच ५० टक्के सवलतीचा लाभ मिळत आहे.
एसटीचे उत्पन्न वाढीसाठी महामंडळाचे प्रयत्न
“बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील”, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.






