येलवाडीत 85 टक्के मतदान; सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
देहूगांव / बद्रीनारायण घुगे : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण २०२६ साठी शनिवार (ता.7) रोजी झालेली सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया येलवाडी परिसरात अत्यंत शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीतरीत्या पूर्ण झाली.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. मतदारांनी मोठ्या उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावला कान्हेवाडी तर्फे चाकण – ८५४, सांगुर्डी – १०९७, येलवाडी – २९३२, खालुंब्रे – १६४१, म्हाळुंगे – २८४०, सावरदरी – १०१६, वासुली – ८१२, शिंदे – १३१४, नानेकरवाडी – ३२४०, खराबवाडी – ४३१०, बिरदवडी – ११११ अशा एकूण २१,०६७ मतदारांनी मतदान करून सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. येलवाडी गणात सुमारे ८५ टक्के मतदान नोंदविले गेले.
खेड तालुका जिल्हा परिषद गणासाठी :
१) जीवन खराबी (मशाल – उबाठा),
२) गणेश नाणेकर (धनुष्यबाण – शिंदे गट)
३) गणेश बोत्रे (घड्याळ – अजित पवार गट)
हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
तर पंचायत समिती गणासाठी
१) अर्चना नितीन गाडे (धनुष्यबाण – शिंदे गट),
२) अश्विनी सोमनाथ तरस (घड्याळ – अजित पवार गट)
३) दीपाली अमित बवले (मशाल – उबाठा)
या तीन महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.
अनुभवी मतदारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, खेड तालुक्यातील आठ जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) – १, शिवसेना (उबाठा) – १, भाजप – २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ४ अशी विजयी उमेदवारांची बलाबल स्थिती राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद गणात जीवन खराबी (मशाल) आणि गणेश बोत्रे (घड्याळ) यांच्यातच खरी अटीतटीची लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर पंचायत समिती गणात अश्विनी तरस आणि दीपाली बवले यांच्यात प्रमुख चुरस असून, सध्याच्या स्थितीत अश्विनी तरस यांचे पारडे जड मानले जात आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव






