नांदेड : मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या सोलापुरातील उमेदवार प्रणिती शिंदे यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधील भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे गेले असता गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडविला. पोलिसांनी याप्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मराठा समाजाच्या बांधव आणि गावकऱ्यांचा रोष पाहून चव्हाण यांना माघारी परतावे लागले होते. मात्र, गाड्या परतल्यानंतर त्यांच्या ताफ्यावर काही तरुणांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा तरुणांकडून देण्यात आल्या. चव्हाण यांना जाब विचारण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला.
पोलिसांकडून जमाव पांगविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, गावकऱ्यांचा वाढता रोष पाहून अशोक चव्हाण यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्याच गाडीमधून चव्हाण यांना बाहेर काढण्यात आल्याचेही समजते. चव्हाण यांचा ताफानंतर नांदेडच्या दिशेने परत निघाला.
मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल
पोलिसांनी याप्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ज्यात शासकीय कामात अडथळा, पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत थेट 353 सारख्या कलमांची नोंद करण्यात आली आहे.