खळबळजनक ! मल्टी मिक्स सिरीयल्स अँण्ड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये आढळला मेलेला उंदिर, वडखळ ग्रामपंचायतीतील घटना
पेण/विजय मोकल: अंगणवाडीतील खाऊमध्ये मृत जीव आढळण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशीच एक चिंताजनक घटना वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्र. 03 मध्ये घडली आहे. यामुळे स्थानिक पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्र. 03 मध्ये ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांकरीता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टी मिक्स सिरीयल्स अँण्ड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदिर आढळून आला आहे. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात ही घटना घडली असून महिला व बालविकास मंत्री आदीतीताई तटकरे यांनी या घटनेची दखल घेऊन सदर वितरण करण्यात आलेल्या या खाऊच्या वाटपाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करतील का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. सदर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
GBS आजाराचा धोका वाढला; सोलापुरात एका रूग्णाचा मृत्यू; पुण्यात 4 रुग्ण व्हेंटिलेटरवर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत वडखळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीन अंगणवाड्या असून त्यातील अंगणवाडी क्र. 03 मध्ये ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांकरीता घरपोच वाटप करण्यासाठी येणारे मल्टी मिक्स सिरीयल्स अँण्ड प्रोटीन्स चे बैच नं MMCC 1351P, उत्पादन दि. ५/०१/२०२५ या पाकिटा मधील खाऊमध्ये मेलेला उंदिर आढळून आला. यावेळी अंगणवाडी सेविका यांच्या लक्षात आल्याने मोठा बाका प्रसंग टळला.
सदर घटनेची खबर मिळताच वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी भेट सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ग्रामविकास अधिकारी यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना फोन करून सदर घटनेची खबर दिल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी येऊन पाहणी केली व याबाबतचा पंचनामा केला. तसेच सदर घटनेची खबर मिळताच नुकताच गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या सोनल सूर्यवंशी यांनी सदर ठिकाणी भेट माहिती घेतली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यानांही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत या खाऊचे वितरण मल्टी मिक्स सिरीयल्स अँण्ड प्रोटीन्स ही कंपनी करीत असून सदर खाऊ गुजरात राज्यातून पॅकिंग होऊन येत असल्याचे समजले आहे.
मल्टी मिक्स सिरीयल्स अँण्ड प्रोटीन्सच्या या पॅकेटवर एक्सपायरी डेट मे 2025 आहे. ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांकरीता घरपोच वाटप करण्यात येत असून ते किती वाटप झाले याची माहिती घेणे महत्वाचे आहे. तसेच जिल्ह्यात या खाऊच्या वाटपावर स्थगिती आणून ते खाऊ बाधित आहे का हे पाहणे देखील आवश्यक आहे.