सौजन्य - नवराष्ट्र टीम
नीरा : राज्य सरकारने जादूटोणा विरोधी कायदा केला असला, भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला असला तरी देखील पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व पट्ट्यात आणि बारामतीच्या पश्चिम भागांमध्ये सध्या जादूटोणा आणि बुवाबाजीला ऊत आला आहे. रस्त्यावर सापडणारे उतारे आता नेहमीचेच झाले आहेत. अनेक लोकांना या बुवा, देवऋषी, बाबांनी आणि अंगारे धुपारे करणाऱ्या महाराजांनी अक्षरशः वेड लावले आहे. कर्नलवाडी येथे गुरुवारी सकाळी असाच एक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीच्या शेतातील झाडावर लाल फडक्यामध्ये लिंबू, मिरची, नारळ, कोहळा आणि तीन मडकी त्याचबरोबर त्यामध्ये चिठ्ठी लिहून दोन फडक्या मध्ये ठेवलेली आढळून आली. त्यामुळे या परिसरामध्ये आता भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार करणी किंवा जादूटोण्याचा असावा, अशी शंका लोकांकडून व्यक्त केली जात आहे.
कर्नलवाडी (ता.पुरंदर) येथील नंदकुमार अवचितराव निगडे यांच्या शेतात हा प्रकार घडला आहे. लिंबू, नारळ, तीन छोटी मडकी आणि एका व्यक्तीचे नाव लिहिलेली चिठ्ठी हे सर्व साहित्य दोन लाल फडक्यामध्ये बांधून झाडाला लटकवण्यात आले होते. निगडे हे आता बारामती मध्ये राहतात. त्यामुळे त्यांचे शेताकडे फारस लक्ष नसते. मात्र त्यांच्या शेजारील शेतकऱ्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली आणि यानंतर या ठिकाणी लोकांनी एकत्र येत हे गाठोड झाडावरून सोडले असता त्यामध्ये हे साहित्य आढळून आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार करणी किंवा जादूटोण्याचा असू शकतो, असं कर्नलवाडी येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी या गावांमध्ये मागील अनेक दिवसापासून असे प्रकार घडत आहेत. मागे देखील अशाच प्रकार उघडकीस आला होता. या भागांमध्ये आता भोंदू बाबांचं प्रस्थ वाढले आहे. या भागात असलेल्या अनेक महाराजांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या गावातून लोक येत असतात. एकेकाळी काहीच नसणाऱ्या या भोंदू बाबांच्या घरी आता गावाबाहेरील लोकांचा मोठा राबता असल्याचं पाहायला मिळते आहे. नीरा, गुळूंचे, कर्नलवाडी, राख त्याचबरोबर बारामती तालुक्यातील निंबूत, वडगाव, सोमेश्वरनगर अशा महत्त्वाच्या गावांमधून देखील अनेक भोंदू बाबांचे आणि देवऋषी यांचे मोठे प्रस्थ वाढले आहे.
अनेकांनी तर मंदिरे बांधली आहेत. या मंदिरांमधून मोठमोठे कार्यक्रम देखील होत आहेत. अनेकांची करणी बाधा काढण्याचे प्रकार या ठिकाणी घडत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार होत असताना मोठे मोठे राजकीय पुढारी नेतेमंडळी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे या भोंदू बाबांचे प्रस्थ वाढत असून त्यांच्यामध्ये कोणतीही भीती आता उरली नाही. त्यामुळे सर्वसामान्य पीडित लोकांना हेरून त्यांना भूत बाधा झाली आहे, कोणी करणी केली आहे, असे सांगून मोठमोठे कार्यक्रम करायला लावले जातात. अंगारे धुपारे केले जातात. मोठ्या संख्येने पशुबळी दिले जातात. यातूनच पुढे नरबळी पर्यंत मजल जाते. अशा दिनदुबळ्या लोकांकडून हजारात नाही तर लाखो मध्ये बिदागी घेतली जाते. त्यामुळेच या भागात सध्या सुरू असलेल्या या बुवाबाजीकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे.
कोणाचातरी बळी गेल्यावर सरकार जागे होणार काय ?
या भागामध्ये सध्या अनेक बुवा आणि महाराज उदयाला आले आहेत. त्यांचे अनेक भक्तगण आहेत. बुवा महाराज जे सांगतील, ते करायची भक्तांची तयारी असते. यामुळे पुढील काळात या भागात नरबळी सारखी घटना देखील होऊ शकते. त्यामुळे प्रशासन, त्या भागातील ग्रामस्थांनी त्याच बरोबर ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे. सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला असला, त्याचबरोबर देवदासी निर्मूलन उपक्रम राबवला असला तरी देखील सध्या त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पुढे येत आहे.