आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. यामुळे शेतीतील अनिश्चितता वाढली असून शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान देखील होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर हवामान माहिती मिळणं गरजेचं झालं आहे. शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर हवामानाबाबत माहिती मिळावी यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात उभारण्यात येत असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी आतापर्यंत २ हजार ५८४ महसूल मंडळापैकी २ हजार ३२१ मंडळांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
केंद्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेली ही स्वयंचलित हवामान केंद्रे ‘महावेध’ प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे शेतक-यांची शेती अधिक स्मार्ट आणि सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात एकूण २७ हजार ८५७ ग्रामपंचायती असून, केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विंडस (WINDS) प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात २५ हजार ५२२ ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स तसेच पूर्वानुमान विश्लेषण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, पावसाचे प्रमाण, तापमान, आद्रता, वाऱ्याचा वेग यासारखी माहिती वेळेत उपलब्ध होणार आहे. या माहितीचा उपयोग अॅग्रीस्टॅक, महा-अॅग्रीटेक, क्रॉपसॅप अंगमार्कनेट डिजिटल शेतीशाळा आणि महा-डीबीटी यांसारखे महत्त्वाचे कृषी प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी केला जाणार आहे.
अकोला जिल्ह्यात सध्या ५२ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत आहेत, ५३४ ग्रामपंचायतींपैकी ४८३ ठिकाणी नवीन केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी, कापणी यासारख्या महत्त्वाच्या शेती कामांचे नियोजन अचूकपणे करण्यासाठी मदत होणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर या केंद्रांमधून मिळणाऱ्या अचूक हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कृषी सल्ला मिळेल. यामुळे पिकाचे नुकसान कमी होणार आहे आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.






