बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : लग्न झालेले असतानाही महिलेची फसवणूक करून तिच्याशी दुसरे लग्न करून तिचा छळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर कादीर शेख (वय २७) असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर या ठिकाणी नेमणुकीस असणारे पोलीस कर्मचारी अकबर कादीर शेख याचा विवाह ३१ मार्च २०१८ रोजी तक्रारदार महिलेसोबत आळंदी या ठिकाणी झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. लग्न झाल्यापासून अकबर शेख याने तक्रारदार महिलेला कधीही मूळगावी नेले नाही.
तसेच छोट्या-मोठ्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. हे लग्न होण्यापूर्वी सुद्धा त्याचे पहिले लग्न झाल्याचे पीडित महिलेला समजले. याबाबत पीडितेने त्याच्याशी बोलले असता तिला दमदाटी केली. तसेच तिच्याशी अकबर शेख याने अनैसर्गिक संबंध ठेवले. तसेच तिच्या व मुलाच्या नावाची कोणतीही कागदपत्रे अद्याप काढलेली नाहीत. या प्रकारची तक्रार दाखल केल्याने सदर कर्मचाऱ्यावर ४९८अ ५०४, ५०६ व सदर महिलेने पुरवणी जबाब दिल्याने भादवि कलम ३७७ प्रमाणे कलम वाढ करून गुन्हा दाखल केलेला आहे.