बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. तसेच त्यांनी बीड (Beed) तालुक्यातील नाळवंडीमध्ये जाहीर सभा घेतली. तिथे त्यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पंकजा मुंडे यांचे भाषण सुरु झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडत असूनसुद्धा पंकजा मुंडे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले होते. भर पावसात सुरु असलेले भाषण पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.
नरेंद्र मोदींनी दिलेल्या संधीचे सोनं करू – पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचा संकेत आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही,असे पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या. विरोधकांकडे बोलण्यासाठी दुसरा कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे मत वाया घालवू नका. बीड जिल्ह्याचा विकास काय असतो हे मी दाखवून दिले आहे. जात-पात धर्म सोडून मला मतदान करा. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी माझ्यासाठी आणि माझ्या परिवारातील कोणासाठी मागण्यासाठी येणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील अनेक मोठमोठ्या नेत्यांची तिकिटे कापण्यात आली आहेत. मात्र पक्षातील काही नेत्यांनी मला संधी दिली. त्यामुळे नरेंद्र मोदींनी मला संधी त्याचे मी सोनं करेन. बीड जिल्ह्याची जनता मला मान खाली घालायला लावणार नाही,असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली. बीड मतदारसंघात मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव सगळीकडे आहे. बीडमधील वंजारी आणि ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या मागे उभा आहे तर बजरंग सोनावणे यांना मराठा समाजातील नागरिक पाठिंबा देऊ शकतात. असे समीकरण असल्याने या मतदार संघात नेमकं कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.