हडपसर - उरळीकांचन दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल (संग्रहित फोटो)
पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व वाढते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकारने हडपसर-यवत दरम्यान सहा पदरी रस्त्याला नुकतीच मंजुरी दिली. यात हडपसर ते उरळीकांचन दरम्यान तब्बल 25 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने हे काम केले जाणार असून, त्यासाठी 5262 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 20 ऑगस्टपासून या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. काम पूर्ण होण्यास किमान पाच वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे 50 हजारपेक्षा जास्त वाहने धावत आहे. यात प्रवासी वाहनासह माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या देखील अधिक आहे.
सोलापूर, हैदराबाद, बारामती या भागातून पुण्यात दाखल होणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहनधारकांना उरळी कांचनपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हीच स्थिती पुण्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांची असते. त्यांना देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. यावर तोडगा म्हणून सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. यामुळे प्रवाशाच्या वेळेत किमान 30 मिनिटांची बचत होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या नव्या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
कसा असणार उड्डाणपूल?
– हडपसर येथील रवीदर्शन सिग्नल पासून उड्डाणपुलाला सुरुवात
– २५ किलोमीटरचा लांबीचा असणार हा पूल.
– हडपसर- मांजरी- लोणी- उरळी कांचन-भिवरी- केसनंद फाटा – यवत असा हा मार्ग असेल.
– हडपसर ते उरुळी कांचन असा २५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल
– हडपसर ते यवत असा ३१.५ किलोमीटरचा रस्ता सहा पदरी केला जाणार.
या उड्डाणपुलाचा फायदा काय?
– सध्या हडपसर, उरुळी कांचन, लोणी काळभोर परिसरात सकाळी आणि सायंकाळी ३० ते ४५ मिनिटांची वाहतूक कोंडी होते. ती कमी होणार.
– हडपसर ते यवत प्रवासाला सध्या ६० ते ७५ मिनिटे लागतात. त्याचा कालावधी किमान ३० मिनिटांनी कमी होण्यास मदत.
– अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
– पीएमपी, एसटी गाड्यांना यवत, सासवड, बारामतीसाठी वेळेवर धावतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फायदेशीर.
– उरुळी कांचन, लोणी काळभोर, भिवरी, यवत यांसारख्या गावांचा पुण्याशी संपर्क जलद व सुलभ होईल.
– ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना मिळेल.
– इंधन आणि वाहन चालकांचा वेळ वाचणार.