फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील धामणशेत कोशीमशेत ग्रुप ग्रामपंचायत मधील १२गावपाड्याना नळजोडणीचे काम झाले नसल्याने जलजीवन मिशनचे पाणी घरापर्यत पोहचले नाही टाकी पर्यत पाणी पोहचले मात्र नळाद्वारे घरापर्यत कधी पोहचणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात असून हंडाभर पाण्यासाठी महिलांची कोसोदूर पायपीट सुरुच असल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत सोनारवाडी, सडकवाडी, धामणशेत, येथे पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत त्यांचे कामही पूर्ण झाले असून टाकी पर्यत पाणी देखील पोहचलेले आहे मात्र टाकीपासून घरापर्यत नळाद्वारे पाणी पोहचवण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग करते आहे
जलकुंभाचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्याचा कालावधी उलटूनही पाणी पुरवठा विभागाने नळजोडणीच्या कामाला सुरवात केलेली नाही यामुळे कामाला सुरवात होणार कधी ? घरापर्यत पाणी पोचणार कधी ? आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार कधी ? हा प्रश्नच असून निधी नसल्याचे भिजत घोंगडे न ठेवता लवकरात लवकर कामाला सुरवात करून महिलांच्या डोक्यारील हंडा उतरवून काम मार्गी लावण्यात यावे अशी मागणी उपसरपंच वैशाली साळवे यांनी केली आहे
सदरचे काम हे सिद्धिविनायक इन्टरप्रायजेस या एजन्सी द्वारे केले जाणार आहे कोशीमशेत, सोनारवाडी , सडकवाडी बेडूकपाडा, फणसपाडा, पायरवाडी, गावठा या गावपाड्यांसाठी १कोटी १७लाख निधी खर्च केला जाणार आहे तर धामणशेत, ठाकूरवाडी ,पाटीलपाडा, बेहटवाडी, पेंडक्याचीवाडी ,या गावपाड्यांसाठी १कोटी ४९लाख खर्च होणार आहे परंतु या कामाला ठेकेदाराने सुरवातच केली नसल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होतो.
निधी नसल्याने काम सुरु करण्यास विलंब झाला असून लवकरच काम सुरु करून मार्गी लावू, ललित बोर्डे (पाणी पुरवठा अधिकारी मोखाडा) यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यात पाणी पुरवठा विभागाने नळयोजनेची कामे पूर्ण केली असताना आमच्याच ग्रामपंचायत मध्ये विलंब का ? यामुळे तात्काळ काम सुरु करा अन्यथा ठेकेदारावर कार्यवाही करा, सुरेश धिंडे (सरपंच) यांचे म्हणणे आहे.






