नवी मुंबईत मासेमारी संकटात! (Photo Credit - X)
वाढत्या प्रदूषणाचाही बसतोय फटका
नवी मुंबईतील बहुतांश मछिमार हे मुंबई येथील भाऊचा धक्का व कुलाबा येशून ताजी मासळी खरेदी करतात. मात्र त्या मासळीची देखील आवक कमी झाल्याने त्यांना देखील भाव वाढीचा फटका बसला आहे.
एकीकडे गारठा वाढला तर दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा सगळा फटका मासळीच्या आवक वर होतो, त्यामुळे कमी मासळी मिळत असल्याने त्यांचे दरही वाढीव झाले आहेत.
दिवाळे खाडी पासून ते ऐरोली खाडी पर्यंत स्थानिक मच्छिमार मासेमारी करतात. या खाडीतून मासे, निवटी, बोईस, कोलंबी तसेच चिवणी मिळतात, पण गारठा वाढल्याने त्यांची देखील आवक खूपच कमी झाली आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांची दिवसभराची मेहनत वाया जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मासळीचे सध्याचे दर (प्रति किलो)
| मासळीचे नाव | दर (प्रति किलो) |
| खापरी पापलेट | ₹ १५०० |
| घौळ | ₹ १३०० |
| जिताडा | ₹ १२०० |
| सुरमई | ₹ ११०० |
| पापलेट | ₹ १००० |
| हलवा | ₹ ९५० |
| कोळंबी | ₹ ७०० |
मासे विक्रेती, दिवाळे (नवी मुंबई) येथील सुरेखा कोबी यांनी सांगितले की, “प्रदूषणामुळे मासे कमी मिळत आहेत, त्यात गारठा वाढल्याने उष्णतेच्या शोधात मासे तळाला जात आहेत. यामुळे आवक घटून दर वाढले आहेत.”
परवडणारे मासेही महाग झाले
दरवर्षी प्रत्येक बदलत्या वातावरणाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम होतो. त्यानुसार सध्या वातावरणातील गारव्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना आवश्यक त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने कधी कधी रिकाम्या हाती परतावे लागते. उन वाढले की जाळ्यात मासोळी सापडली जाते. समुद्रातील वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे अनेक प्रकारचे मासे गायब होऊ लागले आहेत.
मासेमारी संकटात
पापलेट, सुरमई, घोळ आणि इतर अनेक प्रजातीचे मासे मिळेनासे झाले आहेत. मांदेली आणि बोंचील, बांगडे हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे व परवडणारे मासेही महाग झाले आहेत. त्याचा परिणाम मासळीच्या दरवाडीवर झाला आहे. काहींना काही कारणाने मासेमारी संकटात येते. कधी समुद्रात घोगावणारे वादळ, प्रदूषण तर कधी बदलते वातावरण अशा विविध कारणाने मासळीच्या आवक वर परिणाम होत आहे.






