सांगली : एका महिला सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने थेट पोलिस ठाण्यातच आत्महत्या (Suicide in Sangli) केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला. शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवर अतुल पाटील या तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने सांगली शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
अतुल गरजे-पाटील असे या तरुणाचे नाव असून, अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तर एका महिला सावकाराच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. मात्र, शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहिली असून, ती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून, वसूलीच्या तगद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिट्ठीत नमूद केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.