संग्रहित फोटो
नागपूर : एमआयडीसी ठाण्यात (MIDC Police) अकस्मात मृत्यूच्या एका प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. दारूच्या नशेत आईवरून शिवीगाळ केल्यामुळे मित्रानेच दगडाने ठेचून मित्राची हत्या (Murder of Youth) केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीपासूनच दारूड्याच्या मृत्यूबाबत संभ्रम होता. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. अखेर तपासात खून झाल्याचे निष्पन्न झाले आणि मारेकरी त्याचाच मित्र निघाला. आता पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी मित्राला अटक केली आहे. सुनील हरी नारायण पंचेश्वर (वय 24, रा. भीमनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गेल्या 23 मेच्या सकाळी राजीवनगरमागील टेकडीवर चंदन शिवपूजन शहा (वय 22 रा. कार्तिकनगर, हिंगणा रोड) मृतावस्थेत आढळला होता. चंदनला दारूचे व्यसन होते. दारू मिळाली नाही तर तो थिनर आणि व्हाईटनचा नशा करायचा. यामुळे नशेत तो टेकडीवरून पडला आणि डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज लोकांनी लावला. पोलिसांनी चंदनची वहिनी मुस्कान कुंदन शहा (वय 23) च्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू होता.
पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी सांगितले की, घटनेच्या दिवसापासूनच सुनील परिसरातून गायब होता. सुनील आणि चंदन जवळचे मित्र होते. रोज सोबत बसूनच दोघे होते. 22 मेच्या रात्रीही दोघांनी सोबत बसून दारू ढोसली. नशेत दोघांमध्ये वाद झाला. चंदनने सुनीलला आईवरून शिविगाळ केली. यामुळे संतापून सुनीलने चंदनचे डोके आणि चेहरा दगडाने ठेचून खून केला. त्याने काही लोकांना चंदनला मारल्याची माहिती ही दिली होती.
उत्तरीय तपासणी अहवालात चंदनचे डोके आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्या जखमा पडल्यामुळे की कोणीतरी मारल्यामुळे आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. हळूहळू संपूर्ण परिसरात हे वृत पसरले आणि मुस्कानला याबाबत समजले. तपासादरम्यान मुस्कानने सुनीलवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी मुस्कान आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे जबाब नोंदविले. बुधवारी पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून सुनीलला अटक केली. गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.