संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात किरकोळ तसेच जुन्या वादासह टोळी युद्धातून खूनाच्या प्रयत्नाच्या घटना घडत असून, किरकोळ वादातून कात्रीने तरुणावर वार करण्यात आल्याची घटना गुलटेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आतिष सतीश अडागळे (वय २९, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शाकीर मेहबूब शेख (वय ४३) याला अटक केली. याबाबत अडागळे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अडागळे आणि शेख एकाच भागात राहायला आहेत. आतिष हे गुरुवारी रात्री बहीण संगीता राजू उमाप यांच्याशी गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी शेख तेथे आला. ‘तू वस्तीतील मोठा नेता झाला का ?’, अशी विचारणा करून त्याने अडागळेला शिवीगाळ केली. शेखने त्याच्याकडील कात्रीने डोक्यावर वार केले. त्याला मारहाण करून शेख पसार झाला. पोलिसांनी शेखला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक जोग अधिक तपास करत आहेत.
पुण्यात गुन्हेगारी वाढली
टोळी युद्धातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाची घटना घडल्यापासून पुणे शहरातील खूनाचे सुरूच राहिले आहे. हडपसरनंतर आता स्वारगेटमधील डायसप्लॉट परिसरात मोक्कातील गुन्हेगाराने जामीनावर बाहेर आल्यानंतर एका तरुणाचा जुन्या वादातून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर चाकूने वार करून निर्घुन खून केला असून, या खुनाने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सुनील सरोदे (वय २०, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सरोदेच्या मानेवर चाकूने वार करण्यात आला. मानेची नस तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे, साहिल कांबळे, शिवशरण धेंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.