Latur ZP Panchayat Election: ग्रामीण विकासावरून भाजपावर धीरज देशमुखांचा हल्लाबोल
एकीकडे शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देऊन, आपले पीक पिकवतो. पण काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. सरकारकडून सोयाबीन, उडीद, मूगासह सर्वच पिकांना योग्य मोबदला दिला जात नाही. तर दुसरीकडे हेच महायुतीचे सरकार मात्र जाहिरात करण्यात मग्न असल्याची घणाघाती टीका आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. रेणापूर येथे आयोजित गोर बंजारा मेळाव्यात ते बोलत होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व समनक जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने, गोर बंजारा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आमदार देशमुख यांची उपस्थिती होती. श्री जगदंबा देवी नवरात्र महोत्सवानिमित्त कै. मिठारामजी रुपचंद राठोड यांच्या स्मरणार्थ गोर नंगारा व महिला बचत गटांना या कार्यक्रमात पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. आमदार देशमुखांनी नगारा वादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी येथील श्री जगदंबा माता व श्री संत सेवालाल महाराज यांची आरती करून मान्यवरांनी दर्शन घेतले.
सध्या महायुती सरकारकडून आपलं सरकार, लाडकं सरकार अशी मोठी जाहिरातबाजी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धिरज देशमुख यांनी सरकारचा समाचार घेतला.
याप्रसंगी बोलताना आमदार धिरज देशमुख म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारने सर्व समाज घटकांचे हित जोपासण्याचे काम केले. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा झाला. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. माविआने अतिवृष्टी, कोरोना आपत्तीत चांगले काम केले. हे सरकारचे दायित्वच आहे. आज महायुती सरकारकडून एखादी योजना आणली तर अर्धा खर्च जाहिरातीवर केला जातो. शेतकरी पिकविमा मागतोय, शेतीच्या नुकसानीची भरपाई मागतोय, सुशिक्षित तरुण रोजगार मागत आहेत, महिला सुरक्षितता मागत आहेत, ते त्यांना मिळत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एखाद्या योजनेचा निधी वळवून दुसरी योजना पुढे आणली जाते. हे सरकारचे अपयश आहे.”
येणाऱ्या काळात बंजारा समाजाचे प्रश्न सोडवणे, त्यांना न्याय, हक्क देण्यासाठी पक्षाचे नेते नाना पटोले, राहुल गांधी यांच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. याआधी देखील काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला राज्यातील सर्वोच्च पद देऊन गौरव केला. महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना पुढे येण्याचे काम आपले वसंतराव नाईक साहेबांनी केले. हीच शिकवण आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे देखील आमदार देशमुख म्हणाले.
काँग्रेसने बंजारा समाजाला २ मुख्यमंत्री दिले – चव्हाण
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या सहकार्यामुळे लातूरमध्ये इतिहास घडला. बंजारा समाजातून मिठाराम राठोड यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केले. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले. हे विलासराव साहेबांमुळे शक्य झाले. लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी सर्व समाज घटकांना सोबत नेण्याचे, शेतकरी कष्टकऱ्यांना मानसन्मान देण्याचे काम केले. या सुसंस्कृत नेतृत्वामुळे लातूर सुजलाम सुफलाम झाला. काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला दोन मुख्यमंत्री देऊन समाजाचा गौरव केल्याचे मत समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
हिम्मतसिंग महाराजांनी धिरजभैयांना दिले आशीर्वाद
श्री सेवालाल महाराजांचे वंशज हिम्मतसिंग महाराज यांनी यावेळी श्री सेवालाल महाराजांना भोग लावून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. महाराजांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार धिरज विलासराव देशमुख यांना आशीर्वादही दिले. त्याचबरोबर लोकनेते विलासराव देशमुख साहेब व काँग्रेस पक्षाशी बंजारा समाजाचे असलेले ऋणानुबंध यापुढेही जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणापूरच्या माजी सरपंच श्रीमती उषाताई राठोड, उद्घाटक विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय आई वैशालीताई विलासराव देशमुख, समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, हिम्मत सिंग महाराज, रीड लातूरच्या संचालिका दीपाशिखा देशमुख, सुनिता आरळीकर, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, अनंतराव देशमुख, प्रमोद जाधव, उमाकांत खलंग्रे, गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार शेषराव हाके, एल टी चव्हाण, बळीराम जाधव, रामराव महाराज, संदीप राठोड, खेमाबाई राठोड, मालनबाई चव्हाण, प्रदीप राठोड, जयसिंग जाधव, अशोक राठोड, अजय राठोड, जयश्री राठोड, पूजा इगे , शोभा राठोड, सुरेखा राठोड, शरद राठोड, विलास राठोड, सतीश चव्हाण, दयानंद राठोड, दयानायक राठोड, धोंडीराम चव्हाण, सुरेश राठोड, विकास बंजारा, अविनाश राठोड, गोविंद राठोड, महादेव चव्हाण, बालाजी राठोड आदीसह बंजारा समाजबांधव तसेच समनक, गोरसेना व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.






