खंडाळा बसस्थानकात अपघात(संग्रहित फोटो)
खंडाळा : खंडाळा बसस्थानकात एक विचित्र घटना घडली. या ठिकाणी एसटी बस सुरु करताच ती भरधाव वेगाने थेट उपहारगृहाच्या बाजूला असणाऱ्या टाक्यांची भिंती पाडून झुडपात घुसली. यामध्ये चालकासह चार जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने शाळांना स्थानिक सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी बसस्थानकात नसल्याने एक अनर्थ टळला असल्याची चर्चा सुरु होती. बसस्थानकात घडलेल्या घटनेमुळे पारगाव-खंडाळा आगारात तांत्रिक बिघाड व नादुरुस्त एसटी बसेसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पारगाव-खंडाळा आगाराची स्वारगेट-महाबळेश्वर बस चालक दत्तात्रय राऊत हे स्वारगेटहून सकाळी घेऊन निघाले होते. ते पारगाव-खंडाळा बसस्थानकात आले. मात्र,बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येत बस थांबवली. बसमध्ये २७ प्रवासी होते. यातील ४ जण १० मीटरच्या अंतरावर उतरल्याने अपघातावेळी २३ प्रवासी यात होते. बसस्थानकात वाहक, काही प्रवाशी उतरले. त्यानंतर ती बस अचानक पुढे सरकली.
यावेळी दोन दुचाकी, भिंत व पाण्याचे टाक्याला धडकून ही गाडी झाडाला अडकली. या अपघातात राहुल रामचंद्र कुंभार (भोगाव ता. वाई), कमल बाळु कुंभार (रा. शिरवळ) तर मेधा फडतरे (पुणे) व चालक दत्तात्रय राऊत हे गंभीर जखमी झाले. तसेच दोन दुचाकी, भिंत व टाक्याचे मोठे नुकसान झाले. अपघाताचे वृत्त समजताच आगार व्यवस्थापक बिसमिल्ला सय्यद, पवन वाघेला यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
उत्तर प्रदेशातही बसचा अपघात
दुसऱ्या एका घटनेत, उत्तर प्रदेश राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातून जाणाऱ्या आग्रा-लखनौ महामार्गावर एका प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. इटावा जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी झाल्याचे समजते.