हिंगोलीत भीषण अपघात; भरधाव डंपरने अनेकांना चिरडले, दोघांचा मृत्यू तर 6 जण गंभीर (फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
हिंगोली : हिंगोलीत भीषण अपघात झाला. वीटभट्टीसाठी माती वाहून नेणाऱ्या डंपरने भर बाजारात घुसून नागरिकांना चिरडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर, सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
हिंगोलीतील वसमत शहरातील मदिना चौक परिसरात ही घटना घडली. कारखाना परिसरातून माती वाहतूक करणारा डंपर ऑटो रिक्षाला धडकून थेट एका दुकानात शिरला. या भीषण अपघातात पाच ते सहा जण चिरडले असल्याची माहिती समोर आली आहे. दोन ते तीन नागरिकांसह चिमुकले डंपरच्या खाली गेल्याचे सांगण्यात आले. तर, यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बंदी असतानाही जडवाहतूक सुरूच
हिंगोलीतील या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. वसमत शहरात दिवसा जड वाहतुकीला प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली असताना, वीटभट्टीच्या कामासाठी दिवसा देखील मोठ्या प्रमाणात डंपर वाहतूक सुरू आहे. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
स्थानिकांना माहिती मिळताच मदतकार्य सुरु
दरम्यान, घटनास्थळी प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले असून, अपघात स्थळावरून जखमींना वसमत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपुरातही अपघात
दुसऱ्या एका घटनेत, नागपूर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली होती. मालवाहू वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल रोडवर घडली असून, रविवारी संध्याकाळी हा अपघात घडला. रोशन टेकाम, रमेश देहनकर आणि रामकृष्ण मसराम अशी मृतांची नावे आहे.