कारची टेस्ट ड्राइव्ह सहसा सार्वजनिक रस्त्यांवर घेतली जाते, जिथे इतर वाहनांचीही वर्दळ असते. अशा परिस्थितीत तुमच्या किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात झाला तर काय होईल? समजा, तुम्ही नियम पाळून गाडी चालवत आहात, पण समोरून येणाऱ्या एखाद्या बेदरकार चालकाने तुमच्या गाडीला धडक दिली, तर अशा वेळी होणाऱ्या नुकसानीची भरपाई नक्की कोणी करायची, असा प्रश्न निर्माण होतो.
टेस्ट ड्राइव्हसाठी वापरली जाणारी कार ही कंपनीच्या किंवा शोरूमच्या मालकीची असते. कोणत्याही संभाव्य अपघातापासून संरक्षण मिळावे, यासाठी कंपन्या या गाड्यांचा ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह’ किंवा ‘थर्ड-पार्टी’ विमा उतरवतात. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हवेळी अपघात झाल्यास शोरूमच्या मालकाला स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत नाहीत; हे नुकसान विम्यातून कव्हर केले जाते.
जरी अपघाताचा खर्च तुम्हाला द्यावा लागत नसला, तरी सुरक्षिततेसाठी टेस्ट ड्राइव्ह घेताना खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे: गाडी चालवण्यापूर्वी तिचे सर्व कंट्रोल्स आणि फीचर्स नीट समजून घ्या. ड्रायव्हिंग सीटची पोझिशन तुमच्या सोयीनुसार ॲडजस्ट करा. गाडीचा परफॉर्मन्स तपासताना वेग मर्यादेत ठेवा, अतिवेग टाळा. शक्यतो जास्त ट्रॅफिक असलेले रस्ते टाळा. मोकळ्या रस्त्यावर किंवा मैदानावर टेस्ट ड्राइव्ह घेणे अधिक सुरक्षित असते. काही शोरूम टेस्ट ड्राइव्हपूर्वी एका फॉर्मवर स्वाक्षरी घेतात. तो फॉर्म नीट वाचा, कारण काहीवेळा त्यात अपघाताबाबतच्या अटी लिहिलेल्या असू शकतात.






