छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड शहरात ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. हा अपघात टिपू सुलतान चौकात घडला. रितेश ज्ञानेश्वर कळम आणि रुपेश ज्ञानेश्वर कळम अशी या अपघातात ठार झालेल्या भावांची नावे आहेत.
रितेश आणि रुपेश हे दोघे भाऊ सिल्लोड तालुक्यातील भवन येथील रहिवासी होते. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. याप्रकरणाची नोंद सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नुकताच झाला पोलिसांचा अपघात
वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस वाहनाचा अपघात झाला होता. नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या समोर पेट्रोलिंगदरम्यान हरण आडवे आले होते. त्याचदरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे पेट्रोलिंग वाहन हे झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाला. या भीषण अपघातात विठ्ठल बदने हे पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले. तर सिध्देश्वर विधाटे हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आता ही घटना घडल्याचे समोर आले आहे.