मंगळवेढा : मंगळवेढा-उचेठाण मार्गावर बेकायदेशीर रित्या दुचाकीवरून दारु वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षीक नयोमी साटम यांनी हि कारवाई केली. त्यांच्याकडून 79 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान याप्रकरणी विलास कोंडीबा कराळे (वय 52, रा. सरकोली) याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 रोजी भर दुपारी उचेठाणकडे दुचाकीवरून अवैधरित्या दारु वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती साटम यांना मिळली होती. त्यांनी पोलिसांच्या मदतीने कारखाना रोडवरील सुतमिल जवळ सापळा रचून कराळे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता 89 हजार 570 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या घटनेची फिर्याद पोलीस शिपाई मळसिध्द कोळी यांनी दिली.
प्रशिक्षणार्थी अधिक्षीका नयोमी साटम या अॅक्शन मोडवर आल्या आहेत. त्यांनी बेकायदा वाळू वाहतूक, बेकायदा दारु विक्री, बेकायदा जनावरे वाहतूक आदींवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदेवाल्यांनी धसका घेतला होता. या कारवाईमुळे अवैध ढाब्यावरुन दारु विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाईचे फर्मान असूनही दुर्लक्ष
महाराष्ट्र शासनाने पाठीमागे अवैध दारु व्यवसायावर जिल्हा दारु उत्पादक व ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्याचे लेखी फर्मान काढले होते. मात्र या आदेशाचे पालन दारु उत्पादन शुल्क विभाग करीत नसल्याचे दिसून येत आहे. दारु व्यवसायावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विभाग नेमला असतानाही त्यांनी आत्तापर्यंत मंगळवेढा तालुक्याकडे पाठ फिरविल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. दारु उत्पादक जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकारी नितीन धार्मिक यांनी याकामी लक्ष घालून मंगळवेढा तालुक्यात मुक्तपणे ढाब्यावर दारु पिणाऱ्यावर कारवाई करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे.