फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेते,फुल विक्रेते,स्थानिक बाजारपेठ,भाजीपाला विक्रेते आणि दुकाने यांच्यावर नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली.या मोहिमेंतर्गत ५० मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी,वस्तू वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून एकूण १८ किलो प्लास्टिक जप्त करून १८ हजार २०० रुपये रकमेचा दंड वसूल करण्यात आला.
एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवलीत कारवाई करण्यात आली. ही कारवाई कणकवली नगरपंचायत पाणी पुरवठा व मलनिसारण अभियंता सोनाली खैरे,स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, ध्वजा उचले, आरोग्य लिपिक सतीश कांबळे,शहर समन्वयक वर्षा कांबळे , कणकवली नगरपंचायत कर्मचारी राजेश राणे, रवींद्र म्हाडेश्वर,सुजल मुणगेकर, संदेश तांबे व इतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केली.
व्यापारी व नागरिकांनी ५० मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळावा व कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.
भारतातील प्लास्टिक बंदी
केंद्र सरकारने ऑगस्ट २०२१ मध्ये भारतात विशिष्ट एकल-वापर प्लास्टिक (SUP) वस्तूंवर बंदी घालण्यासाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ मध्ये सुधारणा केली. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (सुधारणा) नियम, २०२२, १ जुलै २०२२ पासून लागू झाले आणि कमी उपयुक्तता आणि जास्त कचरा टाकण्याची क्षमता असलेल्या विशिष्ट एकल-वापर प्लास्टिक वस्तूंचे देशव्यापी उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (सुधारणा) नियम, २०२२ नुसार प्लास्टिक पॅकेजिंगसाठी विस्तारित उत्पादक जबाबदारी (EPR) बद्दल मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली. हे देखील १ जुलै २०२२ पासून लागू आहे.
खालील एसयूपी वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे: प्लास्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक्स, आईस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठी पॉलिस्टीरिन (थर्मोकॉल), प्लास्टिक प्लेट्स, कप, ग्लास, काटे, चमचे आणि चाकू यांसारखे कटलरी, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या पेट्यांभोवती गुंडाळण्यासाठी किंवा पॅकिंग फिल्म, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पाकिटे इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे.
प्लास्टिकचा वापर कमी करणे हेच ध्येय सरकारचे आहे. प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे.त्याच्यावर पुर्नप्रक्रिया करुनच त्याचा वापर करु शकतो. मात्र एकल वापर प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक असल्याने त्याचा वापर टाळलाच पाहिजे.