संग्रहित फोटो
पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये चिखली–कुदळवाडीत मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून हजारो अनधिकृत झोपड्या, पत्राशेड, बांधकामे, भंगार अड्डे आणि अवैध कारखान्यांना जमीनदोस्त केले होते. ही कारवाई इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखणे, परिसराचा नियोजित विकास अंमलात आणणे आणि परिसरात वावरणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांच्या बिमोडासाठी केली होती. या कारवाईनंतरही काही अनधिकृत भंगार दुकानांनी पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे.
वास्तविक, बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर गृहविभागाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अहवाल मागवला होता. बेकायदेशीर भंगार दुकाने आणि बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली आहे. या पुढील काळातही कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निर्देश दिले आहेत.
बांगलादेशी घुसखोरांचा पर्दाफाश
चिखली पोलिसांच्या कारवाईत २७ मार्च २०२५ रोजी तळवडे येथे दोन महिला आणि एक किशोरवयीन मुलगा बांगलादेशी असल्याचे उघड झाले. त्यांचा टुरिस्ट व्हिसा २०२२ मध्येच संपला होता, तरीही ते भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. तपासात मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख याने त्यांचे पासपोर्ट जाळून पुरावे नष्ट केल्याचे, तसेच आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्रे बनवून ‘भारतीय’ ओळख तयार केल्याचे समोर आले. या प्रकरणात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
गृहविभागाचे आदेश
शासनाने २७ जून २०२५ रोजी विशेष परिपत्रक काढून चिखली, कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि भंगार व्यवसायांवर समन्वित मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार, परिसरात बांगलादेशी नागरिक आढळल्याने अटक, तपास, सत्यापन व दस्तऐवज छाननीची कारवाई सतत आणि तीव्र पद्धतीने केली जाणार आहे. महापालिका, पोलिस आणि महसूल विभाग संयुक्त मोहीम राबविणार आहेत.
कुदळवाडी, चिखली परिसरात बेकायदेशीर भंगार दुकाने, अनधिकृत अतिक्रमणे आणि घुसखोरी करणारे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. फेब्रुवारीतील अतिक्रमण कारवाईसारखीच आणखी व्यापक मोहीम सुरू राहील. राष्ट्र सुरक्षा, नदी प्रदूषण प्रतिबंध आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सुरक्षित परिसर आणि नियोजित विकास यालाच आमचे प्राधान्य आहे. – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.






