सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. स्वारगेट डेपोत घडलेल्या घटनेच्या निमित्ताने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. ह्या अनुषंगाने आजच्या बैठकीत त्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला असून, येथील सुरक्षा कर्मचारी वाढविणे यासोबतच एसटी महामंडळात एक सुरक्षा रक्षक कमिटी नेमून त्यात आयपीएस दर्जाचा सुरक्षा अधिकारी नेमणार असल्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यांनी एसटी महामंडळ आणि पोलिस अधिकाऱ्यांची शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी डीसीपी अमोल झेंडे, एसीपी वाहतूक अश्विनी राख, प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांच्यासह एसटी, पोलिस आणि आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीबद्दल माहिती देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पूर्वी सारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्याने नेमण्यात येतील. पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत त्यांची संख्या देखील आता वाढविण्यात येईल. महिला सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करण्याची गरज आहे त्या तत्काळ करणार असल्याचे सांगताना या प्रकरणाच्या ऑडिट मध्ये जे कोणी अधिकारी किंवा ठेकेदार दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
एसटी बसस्थानाकाच्या आवारात तक्रार निवारण कक्ष, तक्रार नोंदवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक राज्यात दिला जाईल, तसेच खासगी बस चालकांची एसटी स्थानकात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देखील उपाययोजना आखण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या स्क्रॅप पॉलिसी नुसार ज्या बसेस स्क्रॅप करण्याची गरज आहे, त्या राज्यातील सर्व आगारातील बसेस येत्या 15 एप्रिल पर्यंत स्क्रॅप करणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.
दत्ता गाडेला 12 दिवसांची पोलीस कोठडी
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणात अटक करण्यात आलेल्या नराधमाला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत (12 दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी दत्तात्रयने पिडीत तरुणीला ताई म्हणून बोलण्यास सुरूवात केली. कंडक्टर म्हणून तो पिडीत मुलीला बोलला व तिचा विश्वास संपादन केला. त्याने बस दाखवली व अनेक लोक बसमध्ये असल्याचे त्याने दाखविले. पण, बस पुर्ण रिकामी होती. पिडीत तरूणीने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तिने विनंती देखील केली. पण, आरोपीने मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला, असे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.