फोटो सौजन्य: Gemini
शेवगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील ढोरजळगांव, मलकापूर, आखतवाडे, आपेगांव, आव्हाने, माळेगाव, गरडवाडी, भातकुडगांव, परिसरात शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील कपाशी पिके लावलेल्या शेतात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून पुर्णपणे वाया गेली आहेत. तसेच जे काही थोड्या प्रमाणात राहिलेल्या कपाशी पिकावर लाल्या रोग, बोंडे सडणे, पाते गळ, पीक उन्मळून पडणे, पिकांची वाढ खुंटने, फकडी पडणे व्यासह आदी रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने यंदा कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.
सध्या स्थितीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या या पांढऱ्या सोन्याची खरेदी तुटपुंज्या व कवडीमोल दरात केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. कापसाला चांगला भाव नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला असून किमान कापसाला यंदा दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळायला हवा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांनी मोठे कष्ट करून आणि घाम गाळून कपाशीचे पीक जगविले मात्र आता शेतकऱ्याऱ्यांना कापसाचा योग्य तो मोबदला मिळत नसल्याने जो भाव येईल त्या भावाने शेतकरी कापसाची विक्री करताना दिसत आहे. दरवर्षी कापसाचा श्री गणेशा दसऱ्याला व्यापाऱ्यांकडून केला जातो. त्यामुळे दसरा, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काही शेतकऱ्यानी कापूस काढून विकायला सुरुवात केली. कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न बघता थेट व्यापाऱ्यांना कापूस हा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. कापसाला साधारण १० हजार पासून ते १५ हजार रुपयेच्या प्रति क्विंटल दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र खाजगी व्यवसायीक चांगल्या दर्जाचा कापूसही ६००० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे.
परतीच्या पावसाने कापूस अगोदरच खराब झालेला असून जो काही राहिलेला कापूस आहे तो पण शेतकऱ्यांनी सर्व कापूस व्यापाऱ्यांना विकल्यावर शासकीय कापूस खरेदी सुरु होणार का असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकरी संभाजी फसले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.






