फोटो सौजन्य: iStock
अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात बिबट्याने दोन स्वतंत्र हल्ल्यांत एकाचा मृत्यू, एक महिला थोडक्यात बचावली. कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. येसगाव येथे झालेल्या हल्ल्यात शांताबाई अहिलाजी निकोले (रा. येसगाव) यांचा मृत्यू झाला, तर सुरेगाव येथे एका महिलेला ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे जीव वाचवता आला. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येसगावमधील घटना सकाळी भाकरे वस्ती परिसरात घडली. शेतात चारा कापत असताना बिबट्याने अचानक शांताबाई निकोले यांच्यावर झडप घातली. हल्ला अत्यंत जोरदार आणि अनपेक्षित असल्याने त्यांना पळण्याची किंवा मदतीसाठी हाक मारण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ संतप्त झाले. नगर–मनमाड महामार्गावरील भास्कर वस्तीजवळ मोठा जमाव जमून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. जमावाकडून वन विभागाच्या अकार्यक्षमतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
तर दुसरी घटना सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली. अनिल वाबळे यांच्या शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेकडे बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबतच्या महिलांच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पळून गेला आणि ती महिला बचावली.
चार दिवसांपूर्वीच टाकळी शिवारात उसतोड मजुराच्या तीन वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सलग तीन गंभीर घटना घडल्याने तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.
या घटनांनंतर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधून नरभक्षक बिबट्या पकडून ठार मारण्याची मागणी केली. मंत्रालयातून मंजुरी मिळताच संगमनेर, राहुरी आणि कोपरगाव येथील वनविभागाच्या पथकांनी घटनास्थळी छावणी केली आहे.
दोन्ही जनप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. परिसर तातडीने ‘बिबट्या प्रभावित क्षेत्र’ घोषित करावे, पिंजरे लावावेत आणि सतत गस्त घालावी, अशी मागणी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.






