अहिल्यानगरमध्ये मंत्री नरहरी झिरवाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन
अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकानिहाय मुलाखतीदरम्यान अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांना निष्ठा राखण्याचे आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, या निवडणुका महायुतीतून लढवायच्या की स्वबळावर, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “पक्ष सोडणारे निवडून येत नाहीत. त्यामुळे संयमाने आणि निष्ठेने काम करा,” असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अरुण तनपुरे, दत्ता पानसरे, संपत बारस्कर, अशा निंबाळकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. झिरवाळ म्हणाले की, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक वाटा मिळावा ही अपेक्षा असून, ज्या ठिकाणी पक्षाची ताकद अधिक आहे तेथे जागा मिळायलाच हव्यात. “मुस्लिम मतदार भाजपला मतदान करत नाहीत म्हणून त्या जागा आपोआप राष्ट्रवादीला द्याव्यात, हे योग्य नाही,” असेही त्यांनी निदर्शनास आणले.
राज्यातील अस्थिरतेचा कालखंड संपला असून महायुतीमुळे स्थैर्य निर्माण झाले आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांना ताकदीने सामोरे जाणे आवश्यक असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. नगर शहर आणि दक्षिण भागात राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असल्याने उमेदवारी देताना स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांचाच विचार व्हावा, असे त्यांचे मत होते.
Chiplun News: कुंभार्ली घाट बनलाय मृत्यूचा सापळा; अपघाताची भीती कायम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीचा निर्णय स्थानिक आमदारांच्या हाती देण्यात आल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. शिर्डी आणि संगमनेर येथे महायुतीनेच निवडणुका लढवल्या जातील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. श्रीरामपूर आणि नेवासे येथेही परिस्थिती साधारण अशीच असून, कोपरगावात मात्र युतीची शक्यता कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेची निवडणूक महायुतीत होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न राहतील, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पराभव मोठा धक्का ठरेल, असेही विखे पाटील म्हणाले.






