अकोले बस डेपो बंद केल्यास आंदोलन करणार! विकास क्रांती सेनेचा इशारा
या संदर्भात विकास क्रांती सेनेने मंगळवार, दि. 27 रोजी अकोले बस डेपो आगार प्रमुखांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीपूर्वी अकोले व संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ब्राम्हणवाडा, चैतन्यपूर, बेलापूर, बदगी, जांभळे, भक्ताचीवाडी, म्हसवंडी, आंबी दुमाला, कुरकुटवाडी, जाचकवाडी या गावांसाठी अकोले–पुणे, अकोले–परेल, आभाळवाडी–अकोले, नगर–कोतुळ, अकोले–कल्याण अशा नियमित बससेवा सुरू होत्या. मात्र, महामारीनंतर या बससेवा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
बससेवा बंद असल्याने पठार भागातील नागरिकांना बोटा, आळेफाटा, घारगाव, संगमनेर तसेच पुणे, नाशिक, अहिल्यानगर, मुंबई या ठिकाणी शिक्षण, नोकरी, व्यवसाय व इतर कामांसाठी जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस थांब्यांवर शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी तासन्तास प्रतीक्षेत उभे राहत असून प्रवासाची मोठी हेळसांड होत आहे.
शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांसाठी प्रवास सुरक्षित वाटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बससेवा नसल्याने नागरिकांना आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: राज्यात मोठ्या हालचाली; ZP इलेक्शनबाबत ‘हा’ मोठा निर्णय
येत्या 10 दिवसांत बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास अकोले आगार बंद करून अकोले बसस्थानकावर ठिय्या जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष समाजसेवक भगवानदादा काळे यांनी दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष सरपंच जालिंदर गागरे, कार्याध्यक्ष इंजि. संतोष फापाळे, सचिव पत्रकार सतीश फापाळे उपस्थित होते.






