फोटो सौजन्य: Gemini
अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील दैनंदिन साफसफाईचे काम दोन सत्रांमध्ये करण्याचा घेतलेला निर्णय मनपा कर्मचारी युनियनने धुडकावून लावला आहे. एकाच सत्रात कामकाज सुरू ठेवण्याची ठाम मागणी करत आयुक्तांना निवेदन दिले आहे. तसेच यासंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास गुरुवारपासून (दि. ९) आरोग्य विभागातील सर्व सफाई कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व सचिव आनंद वायकर यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शहरातील साफसफाईचे कामकाज दोन सत्रांमध्ये करण्याचे आदेश दिले होते. हे काम सकाळी ६ ते १० व दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत करण्याचे आदेश आहेत. मात्र, युनियनच्या मते हा निर्णय प्रत्यक्ष परिस्थितीला धरून नसून कामगारांसाठी अत्यंत गैरसोयीचा आहे.
जगातील सर्वात लांब कार पाहिलीत का? 100 फूट लांब, हेलिपॅड आणि स्विमिंग पूलसह 75 लोक बसतील एवढी जागा
अनेक वर्षांपासून एकाच सत्रात साफसफाईचे काम सुरळीत सुरू असताना अचानक दोन सत्रांचा निर्णय घेणे अयोग्य असल्याचे युनियनच्या पदाधिका-यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. युनियनचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, बहुतांश सफाई कामगारांना पहाटे पाच वाजता घरातून निघावे लागते. वाहतूक सुविधेअभावी अनेकांना पायी हजेरीवर यावे लागते.
एका फेरीसाठी सुमारे एक तासाचा प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत सकाळी काम करून पुन्हा दुपारी हजेरी लावणे कामगारांसाठी अत्यंत कष्टदायक ठरत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून एकाच सत्रात साफसफाईचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा ९ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मनपा कर्मचारी युनियनने दिला आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून दुपारच्या वेळेत प्रचंड उष्णतेचा तडाखा जाणवतो. दुपारी १२ नंतर नागरिकही घराबाहेर पडत नाहीत. अशा वेळी सफाई कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे त्यांच्या आरोग्यास घातक ठरू शकते. उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाचा निर्णय कामगारांच्या जीविताशी खेळ करणारा असल्याचा गंभीर आरोप युनियनने केला आहे.
युनियनच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अडचणी मांडल्या होत्या. उपायुक्त (कर) व अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शहरातील साफसफाईचे कामकाज दोन सत्रात करण्याचा निर्णय झाला, त्याचवेळी ‘नवराष्ट्र’ ने या निर्णयास मनपा कर्मचारी युनियन विरोध करेल, असा अंदाज वर्तवला होता. युनियनचे अनेक पदाधिकारी मनपा पतसंस्थेतील सत्ताधारी आहेत. सफाई कर्मचारी हा पतसंस्थेचा मोठा मतदार आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. युनियनने आता इशारा दिला असल्याने प्रशासन काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






