अंबादास दानवे यांची नांदेडमधील पत्रकार परिषद (फोटो- सोशल मिडिया)
गिरीश रासकर/ अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील उमेदवारीचा झालेला गोंधळ, यातून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ओढवलेली नाराजी दूर करण्यात आघाडीच्या नेत्यांना फारसे यश येत नसल्याचे चित्र सद्या राज्यात दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष बदल करत सत्ताधारी महायुतीच्या पक्षांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असून दररोज आघाडीतील स्थानिक कार्यकर्त्यापासून ते राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेक जण पक्षाला रामराम करत महायुतीत सामील होत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील असेच काहीसे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा दणाणून पराभव होत महायुतीने सर्वाधिक जागा आपल्याकडे खेचून आणल्या. विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात उमेदवारी वरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका महाविकास आघाडीला देखील बसला. मात्र यामध्ये सर्वाधिक फटका हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसल्याचे पहायला मिळाले. अहिल्यानगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेने मागील निवडणुकीवेळी ज्या जागा राखल्या त्या जागा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राखता आल्या नाहीत. याउलट विधानसभेला जिल्ह्यात 2 जागा जिंकत शिंदेंच्या शिवसेनेने जिल्ह्यात आपली पकड मजबूत केली आहे.
अशातच आता गेल्या काही दिवसापासून अहिल्यानगर शहरातील व जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षातील काही नेत्यांच्या चुकीच्या भूमिकेवर व निर्णयावर नाराज होत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार अशी चर्चा सुरू होती. त्या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळणार असून येत्या 30 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी ठाकरेंच्या सेनेतील हे नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झेंडा फडकतो की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा फडकणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान पक्षातील शिवसैनिक पक्ष सोडून जात असल्याची माहिती मिळताच राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे हे काल रात्री उशिरा नगरच्या शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले. त्यानंतर तब्बल एक तासाहून अधिक काळ दानवे आणि नाराज शिवसैनिकांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी संबंधित नाराज शिवसेना नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद दानवें समोर व्यक्त केली. यावर बांधणी देखील कुटुंबातील वाद हा कुटुंबातच मिटवायचा असतो असे म्हणून नाराज शिवसैनिकांचे मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु आता मनधरणीच्या वेळ निघून गेल्याचे सांगत शिवसैनिकांनी पक्ष बदलाच निर्णय झाला असल्याचे दानवेंना सांगितले.
काल रात्रीच्या पार पडलेल्या बैठकीत शिवसैनिकांनी स्पष्टपणे आपली नाराजी विठ्ठलावर नसून विठ्ठलाला घेरलेल्या काही बडव्यांवर असल्याचे दानवेंना सांगितल्याची माहिती मिळाली. विधानसभा निवडणुकीवेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर शिवसेनेच्या जागेवर मित्र पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे आमचा वाद विठ्ठलाशी नसून त्यांना घेरलेल्या बडव्यांशी आहे असे यावेळी बैठकीतील काही पदाधिकाऱ्यांनी अंबादास दानवे यांना सांगितल्याची चर्चा बैठकीनंतर बाहेर सुरू होती.
काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार सुनील शिंदे यांनी काही मोजक्या पदाधिकारी व नगरसेवकांना बैठकीसाठी नगर शहराऐवजी सुप्यातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. विधानसभेत झालेला पराभव व त्यातून निर्माण झालेली कार्यकर्त्यांची नाराजी याला सामोरे जावे लागू नये म्हणून संपर्कप्रमुखांनी शहराच्या बाहेरच ठराविक पदाधिकाऱ्यांना बोलून बैठक उरकल्याची चर्चा त्यावेळी शहरात चांगलीच रंगली होती. या बैठकीत देखील संपर्कप्रमुखांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्याने शिवसैनिक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.