AIMIM वारिस पठाण शनिवार वाड्यावर नमाज पठण प्रकरणावर टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
Shaniwar wada namaz pathan: पुणे : पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्यामध्ये नमाज पठन केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तीन ते चार महिलांनी नमाज पठन केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. याचा व्हिडिओ शेअर करत भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी टीकेची झोड उठवली. तसेच नमाज पठन केल्याच्या जागी गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट देखील झाली. या प्रकरणामुळे पुण्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणामध्ये आता AIMIM पक्षाने देखील उडी घेतली.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यावरील नमाज पठानाविरोधात आवाज उठवल्यानंतर पुण्यामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लीम असा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावरुन महायुतीमध्ये देखील दोन गट निर्माण झाले आहे. यावर एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा भाजपला डिवचले आहे. वारिस पठाण म्हणाले की, भाजप आपल्या देशाची धर्मनिरपेक्ष आणि बहुआयामी धोरण नष्ट करू पाहत आहे. भाजप केवळ द्वेष पसरवण्याचे काम करत आहे जर 3-4 मुस्लीम महिलांनी शुक्रवारी एकाच ठिकाणी नमाज पठण केले तर त्यामुळेच तुम्ही हैराण झालात का? असा सवाल त्यांनी केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, हिंदू लोक ट्रेन आणि विमानतळावर गरबा खेळतात. तेव्हा तर मुसलमान त्यावर कधी आक्षेप घेत नाहीत. ASI द्वारे संरक्षित या जागेत 3 मिनिटांच्या नमाज पठणाने तुम्ही हैराण झाल्याचे त्यांनी डिवचले. तुम्ही अजून किती द्वेष पसरवाल असा सवाल त्यांनी भाजप नेत्यांना केला. शनिवारवाडा नाही तुमची मनं स्वच्छ, शुद्ध करणे गरजेचे आहे, असे देखील वारिस पठान म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तर यांच्या पोटात दुखायला लागतं
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मेधा कुलकर्णी यांची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, “पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आणि काही हिंदुत्तवादी कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी जाऊन गोमूत्र शिंपडले. हे पाहून कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे. यांना शनिवारवाडा हे तिर्थस्थान किंवा देवस्थान वाटत आहे का? शनिवारवाड्यात ‘मस्तानी’चा बराच काळ वावर राहिला आहे. पण पेशव्यांच्या सरदारांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज काढून युनियन जॅक फडकावला होता. जर त्या महिला अशा ठिकाणी देवाचे नाव घेत असतील तर यांच्या पोटात दुखायला लागतं. तर तुम्हीही तिथे बसून जप करत बसा, तुम्हाला कोणी अडवले आहे आहे का? शनिवारवाड्याच्या बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे. त्यामुळे पेशव्यांना त्याबद्दल पेशव्यांना काही अडचण नव्हती. त्या दर्ग्याला शिवून तिथून हवाही येते, ती हवा तुमच्या नाकात गेली असेल, त्यामुळे नाक अशुद्ध झालं असेल तर तुमच्या नाकातही गोमुत्र घालून घ्या,” असे कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.