नवी मुंबई : नवी मुंबई शहरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीत आणि महाविकास आघाडीत प्रत्येक पक्षाने विधानसभात जागा लढवण्याचा पण प्रयत्न केला आहे. यात महायुतीतील मोठा पक्ष असलेला शिंदे गट देखील मागे राहिलेला नाही. गणेश नाईकांना कट्टर विरोधक मानणारा उबाठा गट शिंदे गटात आला आहे. त्यामुळे भाजपसमोर थेट शिंदे गटाचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे शिंदे गट हळूहळू आपली ताकद वाढवू लागला आहे. नुकतेच शिंदे गटाने विधानसभेच्या दोन्ही जागांवर आपण दावेदार असल्याचे शिंदे गटाने म्हंटले आहे. त्यामुळे नवी मुंबईत चर्चांना तोंड फुटले असून दुसरीकडे भाजपाच्या विद्यमान दोन्ही आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषकरून ऐरोली मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढल्याने नाईक कुटुंबीयांसाठी निवडणूक सोपी नसणार आहे. युती झाली तरी गेले काही वर्ष सुरू असलेले राजकीय वाद हे ऐन निवडणुकांमध्ये मत विभागणीसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई येथील ऐरोली विभागातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शुक्रवारी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी खासदार नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाने ऐरोली विधानसभेत शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकांदरम्यान देखील नगरसेवकांची फोडाफोडी वाढणार असून, बेलापुरमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकांवर भाजपा, शिंदे गटाचा डोळा असणार आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही नीती अवलंबली जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. राज्यात महायुती एकत्र लढणार असली तरी, नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध कायम शिंदे गट यांचे वितुष्ट पाहायला मिळाले असल्याने, नवी मुंबईत हे गट एकत्र जरी आले तरी कुरघोड्यांचे राजकारण वाढणार असून, त्याचा फटका गणेश नाईकांना बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे नवी मुंबई पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश करण्यात आला. त्यामुळे शिंदे गट प्रबळ होतानाच जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांची देखील ताकद वाढली आहे. हळदणकर हे चौगुले गटाचेच नगरसेवक म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांनी ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हळदणकर यांच्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला आपलसे करण्यात शिंदे गटाला यश आले आहे. त्यामुळे युतीत लढल्यास गणेश नाईकांना शिंदे गटाची मदत लागणार असून, त्यासाठी हात पुढे करत २०१९ सारखे बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. मात्र मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, राजकीय द्वंद्व या दोन्ही नेत्यात पाहायला मिळाले असून, हे समीकरण बनते की बिघडते हे पाहावे लागणार आहे.