पुणे : राज्यात भाजपा (BJP) आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अजूनही खातेवाटप मात्र झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (AJit Pawar) यांनी पुण्यातील (Pune) पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारवर टीका केली आहे. अजित पवार यांनी नव्या सरकारच्या कार्यकाळावरही आपलं मत व्यक्त केलं आहे.
ते पुढे म्हणाले,“कुणाचंही सरकार आलं, तरी जोपर्यंत १४५ चा जादुई आकडा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता, तोपर्यंतच ते सरकार टिकत असतं. आत्ताचा विचार करता ज्या दिवशी ते १४५ चा आकडा पूर्ण करू शकणार नाहीत, त्या दिवशी हे सरकार कोसळेल”.
[read_also content=”खातेवाटपावरून होणाऱ्या टीकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-eknath-shinde-comment-about-oppositions-criticism-nrsr-315636.html”]
“बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तर…मी शहीद होण्याचा धोका होता, मी शहीद झालो असतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर अजित पवार म्हणाले की,“त्यांच्या मनात अशी भिती का यावी ? ते राजकीय शहीद झाले असते की खरोखर शहीद झाले असते ते कसं सांगावं ? पण राज्यातल्या जनतेला या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही.”
मुंबईत शिंदे गटाचं पहिलं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, “तो त्यांचा अधिकार आहे. तो विषय न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर आहे. कुणी कुठे कार्यालय काढायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण कार्यालय काढल्यानंतर तिथे लोक सुद्धा भेटायला यायला पाहिजेत. लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे. लोक बघत आहेत. यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी फोडाफोडी केली की जनतेसाठी केली हे जनता ओळखते”.