'कोणाला स्वतंत्र निवडणूक लढण्याची खुमखुमी असेल तर...'; प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना इशारा
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. मात्र, महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच काही दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळवर लढणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर महायुतीमधील नेत्यांनी टीका केली होती.यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले ‘अशोक चव्हाण हे भाजपाचे नेते आहेत का? ते त्यांनी आधी तपासावं’, असं म्हणत खोचक टीका केली आहे. तसेच ‘जर कोणाला स्वतंत्र निवडणूक लढण्याची खुमखुमी असेल राष्ट्रवादी देखील तयार आहे’, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला आहे.
“खासदार अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात नेते आहेत की नाही? हे त्यांनी एकदा तपासावं. मग निवडणुका स्वबळावर लढवायच्या की नाही त्याबाबत बोलावं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीबाबत निर्णय घेत असतात. मात्र, अशोक चव्हाण यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं. पण कोणात स्वतंत्र निवडणूक लढण्याची खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी तयार आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.
“तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची जिल्ह्यात मोठी ताकद एक आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही युतीचा धर्म तोडणार नाही. युतीचा धर्म पाळणारी माणसं आम्ही आहोत. जे माणसं युतीचा धर्म पाळणार नाहीत, तेव्हा पाहू”, असं प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे.