संभाजीनगरमध्ये सत्तारांचा 'गड' अभेद्य, वैजापुरात भाजपची बाजी (Photo Credit - X)
निवडणुकीत शिंदे सेनेने वर्चस्व कायम
संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण, कन्नड, खुलताबाद, गंगापूर आणि वैजापूर या सहा नगर परिषद आणि फुलंब्री नगर पंचायत निवडणुकीत चुरस दिसून आली. वैजापूर नगर परिषद सोडता भाजपला इतर नगर परिषेदवर कब्जा करता आलेला नाही. फुलंब्री नगर पंचायतीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार अनुराधा चव्हाण या निवडून आल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीवर नाराजी दाखवत नगराध्यक्षपदी उबाठा गटाचे राजेंद्र ठोंबरे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पैठण आणि सिल्लोड नगराध्यक्ष निवडणुकीत शिंदे सेनेने वर्चस्व कायम ठेवले.
सत्तार पुत्र समीर नगराध्यक्ष…
सिल्लोड म्हणजे सतार सेत.. अशी कानी पडणारी म्हण तंतोतंत खरी असल्याचे मतदारांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता देवून दाखवून दिले. यावेळी सत्तार यांची सत्ता उलथवण्यासाठी विरोधकांनी जोर लावला होता. सत्तार यांनी विरोधकांचे सर्व आखलेले डाव हाणून पाडले अन् नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र समीर यांना बसवले. यावेळी भाजपनेही सिल्लोड नगर पालिकेवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र मतदारांनी त्यांचा कौल सतारांच्या बाजुने दिला.
नगराध्यक्ष पदाचे विजयी शिलेदार
| नगर परिषद/पंचायत | विजयी उमेदवार | पक्ष |
| सिल्लोड | अब्दुल समीर सत्तार | शिवसेना (शिंदे) |
| पैठण | विद्या कावसानकर | शिवसेना (शिंदे) |
| कन्नड | फरीनबेगम जावीद सेत | काँग्रेस |
| खुलताबाद | आमेर पटेल | काँग्रेस |
| गंगापूर | संजय जाधव | राष्ट्रवादी (अजित पवार) |
| वैजापूर | दिनेश परदेशी | भाजप |
| फुलंब्री | राजेंद्र ठोंबरे | शिवसेना (UBT) |
पहिला निकाल खुलताबाद मधून…..
संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर सर्वात पहिला निकाल आला तो काँग्रेसच्या बाजूने. खुलताबाद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमेर पटेल यांनी विजय मिळवत काँग्रेसचे खाते उघडले. यानंतर दुसरा निकाल लागला तोही काँग्रेसच्या बाजुनेच, कन्नड नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार फरीन बेगम यांनी युतीच्या उमेदवार स्वाती कोल्हे यांचा पराभव केला.
वैजापुरात भाजपा, गंगापुरात राष्ट्रवादी
बहप्रतिक्षीत सहा नगरपालिका आणि फुलंब्री नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेस अनपेक्षीत मुसंडी मारत कन्नड, खुलताबाद तर अपेक्षेप्रमाणे सिल्लोडमध्ये शिंदे सेनेचा ‘सत्तारगड’ अभेद्य राहिला. पैठण येथे शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्षपदावर झेंडा फडकवला. भाजपा वैजापूर, राष्ट्रवादी अजित पवार गटाला गंगापूर तर फुलंब्री नगरपंचायत मध्ये शिवसेना उनाठा उमेदवाराने विजय मिळवला. जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा मान सिल्लोडचे अब्दुल समीर अ. सत्तार यांनी पटकावला. त्यांनी भाजपा उमेदवाराचा तब्बल २३ हजार ५३१ मतांनी पराभव केला. अ. समीर यांना ३१, ४०१ हजार मते पडली. तर कन्नडच्या काँग्रेस उमेदवार फरीन पटेल या अटीतटीच्या लढतीत सर्वात कमी ८५८ मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
या आमदारांना धक्का
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. शिवसेनेच्या आ. रमेश बोरनारे, आ. संजना जाधव यांना त्यांच्या वैजापूर, कन्नड मतदारसंघात धक्का बसला. वैजापूर मध्ये आ. बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे पराभूत झाले. गंगापूर, फुलंब्रीमध्ये भाजपाचे प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण यांना त्यांच्या पक्षाला यश मिळवून देता आले नाही. गंगापूरमध्ये माजी आमदार शिंदेसेनेचे नेते कैलास पाटील यांच्या मुलाचा पराभव झाला. तर सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार, पैठणचे आ. विलास भूमरे यांनी मात्र आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.






