जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यांच्या भूप्रदेशाला ‘खान्देश’ (Khandesh) म्हणून ओळखलं जातं. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षयतृतीया म्हटले जाते, त्यालाच खान्देशात आखाजी असे म्हणतात. या वर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) हा सण आहे. खान्देशात आखाजी हा सण दिवाळीइतकाच महत्त्वाचा मानला जातो. शाळा आणि महाविद्यालयांना असलेली उन्हाळ्याची सुटी ही ‘आखाजी’ची (Akhaji) सुटी म्हणूनच ओळखली जाते. कधीकधी या सुट्ट्या या सणानंतरही लागतात.
मुक्तपणे जगण्याचा दिवस
खान्देशातील आखाजी हा सण सर्वासाठी संपूर्ण बंधनमुक्तीचा दिवस असतो. काम करणाऱ्या मजुरांना या दिवशी सुट्टी असते. शेतकरी सर्व शेतीची कामे या दिवशी बंद ठेवतात. मुलांना, तरुणांना पैसे, पत्ते, जुगार खेळायला पूर्ण मुभा असते. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असते. आबालवृद्धांना आमरस आणि पुरणाची पोळी यासह सांजरी आणि घुण्या अशा मिष्ठान्नांची सुस्ती येते. ‘आगारी’ या प्रथेतून या दिवशी पूर्वजांचीही सोय केलेली आढळते. अशा प्रकारे खान्देशातील प्रत्येक व्यक्ती या सणाला मुक्त असते. दूरवर नोकरी करणारा प्रत्येक जण या दिवशी सुट्टी घेऊन बायकोमुलांसह आपल्या गावी परतलेला असतो.
शेतकरी-शेतमजुरांची आखाजी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शेतकरी शेतीची कामं बंद ठेवतो. शेतमजुरांना या दिवशी सुट्टी असते. वर्षांच्या कराराने काम करणाऱ्या सालदाराचा हिशोब या दिवशी पूर्ण करून त्यास शेतकरी बंधनमुक्त करतो. सालदाराचा हा दिवस जुन्या मालकाकडील वर्षांचा शेवटचा दिवस असतो. याच दिवशी वाढीव रकमेवर शेतमजूर त्याच शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या शेतकऱ्याकडे सालदार म्हणून करारबद्ध होत असतो. शेतकरी व शेतमजूर प्रेमळ, विश्वासू अशा व्यक्तीची निवड करून प्रसंगी जास्तीची रक्कम देऊन करारबद्ध होतात. याच काळात मुलामुलीच्या लग्नासाठी शेतमजूर शेतकऱ्यांकडून आपल्या मजुरीची आगाऊ रक्कमही घेत असतो. या सालदाराची एका वर्षांची मजुरी गावागावांनुसार व शेतकऱ्याच्या कामाच्या व्यापानुसार भिन्न असून साधारणत: आठ ते पंधरा हजार रुपये आणि काही पोते धान्य अशी आढळते. या दिवशी जुन्या सालदाराला मालकातर्फे जेवण दिले जाते. त्यास नवे जोडे कपडे शिवून दिले जातात. जुगार खेळायला व दारू प्यायला अतिरिक्त पैसेही दिले जातात. जुना सालदार आपल्या ताब्यातील कृषी अवजारे मालकातर्फे नव्या सालदाराकडे सुपूर्द करतो. अशा प्रकारे शेतमजुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आखाजी हा सण. त्याच दिवशी हवा तो मालक निवडण्याचे आणि जुन्या मालकापासून रजा घेण्याचे स्वातंत्र्य या शेतमजुरास लाभते.
जुगार खेळण्याचा दिवस
आखाजी हा सण जुगार खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व मुले, माणसे पत्ते खेळतात. वर्षभर पत्त्यांना स्पर्श न करणारी मंडळी या दिवशी हमखास पत्ते खेळतात. त्या खेळात पैसे हरणे किंवा जिंकणे हे आलेच. जुगाराला बंदी असली तरी आखाजीच्या या काळात जुगार खेळला जातो. पूर्वी मुले या जुगारात कवड्याच खेळत असत. या दिवशी शेतमजुरांनासुद्धा जुगार खेळण्यासाठी मालकाकडून खुशाली म्हणून पैसे दिले जातात. जुगार खेळण्याच्या अतृप्त इच्छेला आखाजी या सणामुळे वाट करून दिली जाते. विशेष बाब ही की, मुलांना पैसे व पत्ते देणारे पालक अक्षयतृतीयेच्या दिवसाव्यतिरिक्त वर्षभर पत्ते, पैसे न खेळण्याचे आणि खेळू न देण्याचे नैतिक बंधन पाळतात.
माहेरवाशीणींचा सण
आखाजीला माहेरी जाऊन झोक्यावर बसून सासरची सुखदु:खे गीतातून गायला प्रत्येक माहेरवाशीण आतुर झालेली असते. प्रत्येक विवाहित स्त्री आखाजी या सणासाठी माहेरी जाते. आखाजी हा स्त्रियांसाठी पूर्ण स्वातंत्र्याचा दिवस. हसणे, खिदळणे, झोके घेणे, गाणी गाणे, मारामारी करणे या सर्व अतृप्त इच्छांच्या पूर्तीचा हा दिवस. त्यासाठी सासरी राहून कसे चालेल? सासरी सासू-सासरे, दीर, नणंदा यांच्यासमोर स्वातंत्र्य मिळणे शक्यही नसते. आखाजीचे तीन दिवस स्त्री आपल्या माहेरी जाणं या स्वातंत्र्याचा मनसोक्त आनंद लुटत असते. द्वितीयेला गावभरच्या बायका, मुली एकत्र येतात. डफ वाजवीत बायकांची मिरवणूक शिवमूर्ती आणायला कुंभाराच्या घरी जाते. आधीच घराघरांत स्थापन केलेल्या गवराई ऊर्फ गौरीच्या प्रतिमेजवळ ती प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रभर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासारखे स्वरूप या गौराई उत्सवात खान्देशात आढळते. सर्व मुली, स्त्रिया एकत्रित येतात. गौराईच्या पाणी आणण्याच्या निमित्ताने त्या गावाशेजारच्या आमराईत जमा होऊन झिम्मा, फुगडी, नृत्य करतात, गाणी गातात. गावातून जाताना त्या पुरुष वेशात सजविलेल्या मुलीला वाजतगाजत नेतात. त्यास मोगल असे म्हणतात. मोगल ही मुलगी पॅन्ट, शर्ट, हॅट, डोळ्यांवर गॉगल, हातात उघडे पुस्तक अशा पोशाखात जमावातून वाजतगाजत चालत राहते.
तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असते. गावातून जात असताना बायका, मुली गाणी म्हणतात.
आखाजी पितरांची
आखाजी स्त्री-पुरुष, आबालवृद्धांचा जसा मौजमजा करण्याचा दिवस आहे तसाच तो आपल्या पूर्वजांना, पितरांना श्राद्धविधी करून स्मरण्याचा दिवस आहे. श्राद्ध पूजन हे खान्देशात दोन प्रकारचे आढळते, ज्यांचे आई किंवा वडील वारले ते पहिल्या वर्षी जे श्राद्ध घालतात त्यास ‘डेरगं पूजन’ असे म्हणतात, तर ज्याच्या आप्ताच्या मृत्यूला एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे ते ‘घागर पूजन’ या नावाचे श्राद्धविधी पार पाडतात.
आखाजी बलुतेदारांची
बलुतेदारांना ‘सांजऱ्या’, ‘घुण्या’ हे पदार्थ दिले जातात. वर्षभराच्या कामाची जी ठरलेली रक्कम किंवा धान्याचा हिस्सा असेल तो त्या बलुतेदाराला आखाजी या दिवशीच मिळत असतो. बलुतेदाराच्या या हिश्शाला किंवा रकमेला ‘गव्हाई’ असं म्हणतात. बलुतं या शब्दाला खान्देशात पर्यायी शब्द गव्हाई असा रूढ आहे. बलुतेदार हे आपल्या सेवा शेतकऱ्याला वर्षभर प्रदान करतात. त्या मोबदल्यात त्याच्याकडून रोख रक्कम आणि धान्य अक्षय्यतृतीयेला घेतात. अशा प्रकारे आखाजी हा शेतमजुरांचा आणि बलुतेदारांचा नव्या वर्षांच्या आरंभीचा दिवस आहे.
आखाजीची लगबग
उन्हाळ्याच्या सुरुवातीला खान्देशात घरोघरच्या स्त्रिया वडे, पापड, कुरडया, शेवया करतात. त्यानंतर त्यांना अक्षय्य तृतीयेचे वेध लागतात. अक्षय्य तृतीयेसाठी घर सारवून, झाडून स्वच्छ करतात. घरातील प्रत्येक वस्तू साफ केली जाते. पत्र्याचे डबे, भांडी नदीवर नेऊन घासून आणतात. घरातील चादरी, गोधड्या, वाकळी स्वच्छ धुऊन काढतात. दीपावलीप्रमाणेच आखाजीसाठी घराची साफसफाई केली जाते. घराघरांत ‘सांजोऱ्या’ आणि ‘घुण्या’ हे पदार्थ बनविले जातात.