संग्रहित फोटो
कोल्हापूर/ राजेंद्र पाटील : राज्यातील १४७ नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांसाठी सोमवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांमध्ये महिलाराज दिसणार आहे. या सोडतीनंतर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आता आपला नगराध्यक्ष बसविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षात संभाव्य उमेदवारांची चर्चा रंगू लागली असून, ‘आपलाच नगराध्यक्ष व्हावा’ यासाठी स्थानिक पातळीवर विविध राजकीय समीकरणे जुळविण्याची चढाओढ सुरू झाली आहे.
दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडीक यांच्यासह महायुतीने कंबर कसली आहे, तर माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी ग्राऊंड लेव्हलवर काम करत आहे. जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपरिषदेसाठी अनुसूचित जाती (पुरुष) आरक्षण, तर मलकापूर, पन्हाळा, कागल, मुरगूड आणि कुरुंदवाड नगरपरिषदेसाठी महिला (ओपन) आरक्षण निश्चित झाले आहे. शिरोळ नगरपरिषदेसाठी अनुसूचित जाती (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. जयसिंगपूर जनरल पुरुष आरक्षण जाहीर झाल्याने राजेंद्र पाटील यड्रावकर गट सक्रीय झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महिलांना नेतृत्व करण्याची मोठी संधी मिळणार असून, अनेक महिला कार्यकर्त्या आणि विद्यमान नगरसेविका आता सक्रिय झाल्या आहेत.
आरक्षणानंतर जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या काही दिवसांत तिकीट वाटप आणि आघाड्या जाहीर होताच निवडणूक रणधुमाळी आणखी रंगतदार ठरणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पुढील राजकीय नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता
गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय गटबाजी ठळकपणे दिसत होती. मात्र, यंदा आरक्षणाच्या फेरफारामुळे अनेक ठिकाणी जुनी समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे. प्रमुख राजकीय पक्षात राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, भाजप, आणि काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी काही राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी केली आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी शर्यत
नगराध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याची शर्यत सुरू झाली असून, प्रत्येक ठिकाणी संभाव्य उमेदवारांकडून संपर्क मोहिमा, बैठकांचे आयोजन आणि मतदारांशी संवाद सोमवारी पहिल्याच दिवशी सुरू झाला आहे. काही ठिकाणी विद्यमान नगराध्यक्ष पुन्हा प्रयत्नशील असताना नवीन चेहेरेही संधी मिळवण्यासाठी पुढे येत आहेत. विशेषतः महिला आरक्षणामुळे तरुण आणि सुशिक्षित महिलांना राजकारणात प्रवेश करण्याची नवी दिशा मिळणार आहे.