मुंबई : मुंबईमध्ये लोकसभा निवडणूकीचे मतदान पार पडले आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्य मुख्य सचिवांच्या दोन बोटांवर मतदानाची शाई लावण्यात आली असल्याचा आरोप दानवे यांनी केला. त्याचबरोबर पुण्यातील कल्याणीनगर परिसरामधील अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघात प्रकरणामध्ये कलम चुकीचे लावल्याचा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.
मुंबईच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, “मतदान केंद्रावर अनागोंदी माजली होती. यावेळी सरकार आणि निवडणूक आयोगाची निष्काळजी दिसून आली. या सगळ्या प्रकरणाच्या खोलवर गेलो तर यामध्ये मोठ षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर निवडणूकीच्या पूर्वीच राज्याचे निवडणूक आयुक्तांची बदली केल्यामुळे आयुक्त आपल्या मर्जीचा किंवा सत्ताधाऱ्यांना मदत करणारा हवा होता का,” असा गंभीर सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
भाजपकडून कोट्यवधी रुपयांचे वाटप
त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून खास करुन भाजपकडून पैसे वाटप करण्यात आले. भांडुपमधील भाजपच्या कार्यालयातून उघड उघड कोट्यवधी रुपयांचे वाटप चालू होते. तिथे राज्याचे गृहमंत्री स्वतः भेट द्यायला गेले होते. आपलं कामकाज सोडून त्यांनी भांडुपला भेट दिली होती, याचाच अर्थ काळबेरं होत अशा घटना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला
राज्याच्या मुख्य सचिवाच्या दोन बोटांवर शाई
राज्याच्या मुख्य सचिवाच्या हातावरील दोन बोटांवर शाई लावण्यात आली आहे असा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे म्हणाले, “तुम्हाला आश्चर्य वाटेल पण राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या बोटावर दोन ठिकाणी शाई आहे. खरंतर शाई ही डाव्य़ा हाताच्या तर्जनीवर लावली जाते. मात्र त्यांच्या तर्जनी आणि मधल्या बोटावर सुद्धा शाई लावण्यात आलेली आहे. त्यांनी मलबार या भागामध्ये मतदान केले आहे. त्यांच्या दोन्ही बोटांवर शाई आहे. राज्याच्या मुख्य सचिवाच्या हातावर निवडणूक अधिकारी शाई लावतात याच्यावर ते सामान्य माणसांबाबत काय करु शकतात याचा अंदाज आपण लावावा,” अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
पुणे अपघात प्रकरणात 304 कलम लावलेलं नाही
पुण्यातील अपघात प्रकरणावर देखील अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले, “गृहमंत्री सांगत आहेत त्यांनी 304 कलम लावलं आहे. पण माझ्याकडे एफआयआरची प्रत आहे. त्यांनी 304 (अ) हे कलम लावलं आहे. पुणे पोलीस आयुक्त व गृहमंत्री पत्रकार परिषदेमध्ये 304 कलम लावण्याचं सांगत आहेत. मात्र ते दोघं खोटं वक्तव्य करत आहेत. दोन्ही कलमांना वेगळ्या शिक्षांची तरतुद आहे. त्यामुळे मुद्दामून 304 (अ) लावलं का याची चौकशी झाली पाहिजे,” असे स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी मांडले आहे.