फोटो सौजन्य - सोशल मिडीया
भंडाऱ्यात लग्नासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर लग्नासाठी निघालेल्या कुंटूबाचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी (३० जून) रात्री उशीरा हा अपघात झाला. हे कुटूंबिय रायपूरहून नागपुरच्या दिशेने जात होते. मात्र भंडाऱ्यातील साकोली उड्डाणपुलावर त्यांचा अपघात झाला. या अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू झाला आहे तर एकजण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर सुफल गजभिये (वय ५२) आणि आई कांता गजभिये अशी मृतांची नावं आहेत. तर शिवान सुफल गजभिये (वय १४) असं जखमीचं नाव आहे. जखमीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
गजभिये कुटूंबिय लग्नासाठी रायपूरहून नागपूरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांची गाडी भंडाऱ्यातील साकोली उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली आणि अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे मार्गावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात गाडीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघातामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी रस्त्याच्या बाजूला केल्यानं वाहतूक पुन्हा सुरळित झाली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ शुक्रवारी दोन गाड्यांचा भीषण अपघात झाला. नागपूरहून मुबंईकडे जाणाऱ्या गाडीला डीझेल भरून समोरून येणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्या समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्या. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण गंभीर झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही गाड्या बाहेर काढल्या.