कल्याण : डायघर येथे वनविभागाने प्राण्यांसाठी रुग्णालय उभारले आहे. वनविभागाचा हा एक चांगला उपक्रम आहे, परेलच्या धरतीवर डायघर येथे देखील प्राण्यांसाठी सुसज्ज असे रुग्णालय, रेस्क्यू आणि रिहॅबिलेशन सेंटर उभारणार तसेच त्यासाठी शंभर कोटीचा डीपीआर बनवा. राज्य सरकार, मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून हा निधी देण्यात येईल अशी सूचना वनविभागाला केल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. डोंबिवली जवळील दावडी येथील वन विभागाच्या जमिनीवर कल्याण डोंबिवली महापालिका आणि वन विभागातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या भागात तब्बल 25000 विविध प्रजातीचे झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी वृक्षारोपनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डायघर येथे वनविभागाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ट्रांजिस्ट हॉस्पिटलचे निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राण्यांवर छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातील. या भागात पक्षी, प्राणी, बिबट्यांचा वावर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या तपासण्या गरज वाटल्यास ऑपरेशन पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात डायघरमध्ये होणार आहेत.
रेस्क्यू केलेल्या प्राण्यांसाठी देखील सुविधा करण्यात आली आहे. परेल येथील प्राण्यांच्या हॉस्पिटलच्या धरतीवर ठाण्यात डायघर येथे हॉस्पिटल, रेस्क्यू आणि रिहॅबिलेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाला 100 कोटीचा डीपीआर बनवा, हा निधी देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात निधी वापरत असतो मात्र मुक्या प्राण्यांसाठी देखील त्यांना चांगल्या सुविधा उभ्या राहिल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज पहिलं पाऊल उचलला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.