पुणे : पुण्यातील गोळीबाराच्या घटना थांबत नसून, दहशतीसाठी गोळीबार केल्यानंतर आता प्रेयसीने संपर्क तोडल्याने एका तरुणाने गंज पेठेत तरुणीला भेटण्यास आल्यानंतर तिच्या बहिणीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने ही गोळी कोणाला लागली नाही. परंतु, मावस बहिण गोळी झाडल्यानंतर निघालेल्या आगीमुळे जखमी झाली आहे.
याघटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात ऋषी बागुल आणि त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी शिक्षण घेते. त्यांचा जेवणाच्या पत्रावळ्या व द्रोण बनविण्याचा व्यावसाय आहे. ते घरीच हा व्यवसाय करतात. दरम्यान, तिच्या मोठ्या बहिणीचा घटस्फोट झालेला आहे. ती त्यांच्याकडेच राहते. दरम्यान तिचे व ऋषी बागूल याचे प्रेम संबंध आहेत. त्याबाबत कुटूंबियांना माहिती होती. तत्पुर्वी त्यांच्यात काही दिवसांपुर्वी वाद झाले होते. हे वाद झाल्यानंतर बहिणीने त्याच्याशी संपर्क कमी केला होता. तसेच, काही दिवसांपुर्वी त्याचा मोबाईल नंबर देखील ब्लॉकला टाकला होता. ती त्याच्याशी बोलत नव्हती.
त्यामुळे ऋषी त्याच्या मित्रासोबत प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घरी रात्री दोनच्या सुमरास आला होता. यावेळी त्याने दार वाजवत प्रेयसीला बोलावले. परंतु, ती घरी नव्हती. तिच्या बहिण व मावस बहिणीने ही माहिती दिल्यानंतर मला तिला आताच बोलायचे आहे, असे म्हणत मोठ-मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्या घराबाहेर आल्यानंतर त्याने गोंधळ घातला व तक्रारदार तरुणीला तिला फोन लावण्यास सांगितले. परंतु, तिच्याकडे बॅलेन्स नसल्याने तिने मॅसेजवर बहिणीला ऋषी आल्याचे सांगितले. पण, तिने बोलण्यास नकार दिला.
यावेळी ऋषीने कोणताही संपर्क होत नसल्यने त्याच्याकडील पिस्तूल काढत तक्रारदार तरुणीवरच पिस्तूल रोखत एक गोळी झाडली. पण, सुदैवाने ती लागली नाही. गोळीबाराने तरुणी व मावस बहिण प्रचंड घाबरल्या होत्या. त्या लागलीच पळत घरात गेल्या व लपून बसल्या. यानंतर देखील “मला जर श्वेता मिळाली नाही तर मी कोणालाही सोडणार नाही” अशी धमकी देवुन आरोपीने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावुन दोघेही तेथून निघुन गेले. यानंतर तरूणीने पोलिसांच्या नियत्रंण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. दरम्यान, ऋषीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.