एपीएमसी पोलीस ठाण्याकडून सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन
सावन वैश्य/नवी मुंबई : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि त्याचे बदलते प्रकार लक्षात घेता नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने एपीएमसी पोलीस ठाणे तर्फे व्यापक सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी यांना सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना समजावून सांगण्यात आल्या.
या मोहिमेअंतर्गत जलाराम महाराज जयंती (400–500 नागरिक), अग्रहारी समाज भागवत सप्ताह (1000–1200 नागरिक), अक्षर बिझनेस पार्क (150–200 कर्मचारी), सतरा प्लाझा बिल्डिंग (30–40 कर्मचारी), ॲम्बिअन्स कोर्ट बिल्डिंग (20–30 कर्मचारी), कोपरी तलाव परिसर (100–150 नागरिक) आणि बाकलीवाल कॉलेज (150–200 विद्यार्थी) येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
या सर्व ठिकाणी सायबर गुन्हे घडण्याच्या विविध पद्धती, जसे की OTP फसवणूक, फिशिंग लिंक, डिजिटल अरेस्ट, खोट्या गुंतवणूक स्कीम्स इत्यादींबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. नागरिकांना खालीलप्रमाणे महत्त्वाचे सल्ले देण्यात आले :
🔹 अनोळखी व्यक्तीला OTP किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका
🔹 अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
🔹 डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून सावध राहा
🔹 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विश्वासार्ह माध्यमांचा वापर करा
🔹 पटकन लोन, डबल पैसे, डिस्काउंट यासारख्या प्रलोभनांपासून दूर राहा
🔹 सायबर फसवणूक झाल्यास 1930 / 1945 या हेल्पलाइनवर त्वरित संपर्क साधा
🔹 आपत्कालीन परिस्थितीत 112 वर फोन करा
🔹 नवी मुंबई पोलीसांचे WhatsApp Channel, Instagram, Facebook आणि Twitter Page फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी केले, तर सायबर गुन्हे पोलीस उपनिरीक्षक गोविंद कुटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय उपाळे (आर्थिक गुन्हे तपास अधिकारी) तसेच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या मोहिमेमुळे हजारो नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचारी सायबर सुरक्षेबाबत सजग झाले असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. पुढील काळात अशा जनजागृती उपक्रमांचे सातत्य राखावे, अशी मागणी देखील उपस्थित करण्यात आली आहे.






