मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही...; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
BMC Election: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाई जगताप यांनी केले आहे.
भाई जगताप हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिले असून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईतील राजकारणात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर महाविकास आघाडीच्या पक्षांमधील समीकरणांवर या घोषणेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात बोलताना भाई जगताप म्हणाले की, मुबंई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस लढणार नाही, मी काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्टी डंके की चोट पर सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीतही मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर ही गोष्ट सांगितली होती.
राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. नेत्यांच्या नीही. गेली वर्षानुवर्षे जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन उभे आहेत, आपण कधी ना कधी निवडणूक लढवावी, अशी त्यांचीही इच्छा असते. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, कोणी कोणासोबत लढायचे हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या, आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढुयात, असे काँग्रेसच्या बैठकीत ठरल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.
भाई जगताप म्हणाले, महापालिका निवडणुकीत उद्धवजींसोबत जाऊ नये,असे मी सांगितले होते. तर राज ठाकरेंचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसने आजपर्यंत कधीही राज ठाकरेंना सोबत घेऊ, असे म्हटलेले नाही. महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नाही, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आले त्यावेळी शिवसेना एकटीच होती. आता दोन शिवसेना झाल्या. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा, स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरें बंधुसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही.
काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत म्हणाले की, “मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत आणि त्यामध्ये काही शंका नाही. आमची बैठक चेन्नीथला यांच्यासोबत झाली असून त्यावेळी आम्ही आमची मते स्पष्टपणे मांडली आहेत. प्रत्येक नेत्याची भूमिका चेन्नीथला यांनी बारकाईने ऐकून घेतली.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी चर्चा करून वरिष्ठ नेते निर्णय घेतात. काँग्रेस हायकमांड सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईल.” सावंत यांच्या या वक्तव्यामुळे मनसेसोबत संभाव्य युतीच्या चर्चांवर नव्या चर्चांना ऊत आला आहे.